उद्या समाधान शिबिर : राळेगाव विधानसभा मतदार संघातील समस्या यवतमाळ : राळेगाव विधानसभा मतदार संघात गेले दोन महिने मुख्यमंत्री समाधान शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचा समारोप गुरूवार, २९ डिसेंबर रोजी कळंब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहणार असल्याची माहिती राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते. आमदार डॉ. उईके यांनी सांगितले की, राळेगाव, कळंब व बाभूळगाव या तीन तालुक्यांत मुख्यमंत्री शिबिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्यांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यातून सामान्य जनतेच्या विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा निपटारा करण्यात आला. यात प्रामुख्याने कोलाम आणि पारधी बांधवाना घरोघरी जाऊन जात प्रमाणपत्र देण्यात आले. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातून अनेक गावांतील समस्या त्याच ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित निकाली काढण्यात आल्या. कळंबची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान राबवून चक्रावती नदीचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या नदीवर बंधारे टाकण्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यातील दीड कोटी रूपये प्राप्त झाले. सावरखेडा येथे महाआरोग्य शिबिर घेऊन पाच हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली. राळेगावला सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज उपकेंद्र मंजूर केले. बाभूळगाव येथे रोजगार मेळावा घेऊन सुशिक्षित बेरोजगार आयटीयाधारकांना विविध कंपन्यात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे ४०० युवकांना रोजगार मिळाला. आता गुरूवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. उईके यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. ती मान्य झाली असून रखडलेली कामे लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल, असेही ना. येरावर यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी जिल्हाध्यक्ष उद्धवराव येरमे, जिल्हा परिषद सदस्य अमन गावंडे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री कळंबमध्ये
By admin | Updated: December 28, 2016 00:23 IST