महाड दुर्घटना : वरातीमागून निघाले घोडे यवतमाळ : जिल्ह्यातील पूल, मोऱ्यांची तपासणी करण्याबाबत पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने पत्र पाठविले. रायगड जिल्ह्यात महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर वरातीमागून घोडे नाचविण्याचा हा प्रकार घडल्याने यंत्रणेलाही झटका बसला आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील मोऱ्या, पुलांचे निरीक्षण विविध स्तरावरील अभियंत्यांनी करावयाचे असते. मात्र २०१३-१४ पासून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, रस्ते व पूल दुरूस्ती तथा परीरक्षणाचा कार्यक्रम ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. यात सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला कामे विभागून दिली.पुलांची देखभाल व दुरूस्ती, तपासणी संदर्भात विविध घटक व प्रतीकूल पर्यावरणामुळे पुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. त्यानुसार पुलांबाबत परीपूर्ण निरीक्षण पद्धती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रकात विहित केलेल्या पद्धतीनुसार जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाची निरीक्षणे, तपासणी याबाबत कारवाई करण्याबद्दल पावसाळा संपताना ग्राम विकास व जलसंधारण विभागाने नव्याने सूचना दिल्या आहेत.मोऱ्या व पुलांच्या बांधकामाचे निरीक्षणासंदर्भात तांत्रिक स्तरावर विशेष लक्ष पुरविण्याची सूचना देण्यात आली. प्रत्यक्षात बांधकाम संकल्पानुसार मोऱ्या, पूल कार्यरत असल्याची खात्री करावी. अनपेक्षित घटकांमुळे काही बांधकामांना क्षती पोहोण्याची शक्यता असल्याने नित्य नेमाने मोऱ्या, पुलांचे निरीक्षण, देखभाल व दुरूस्तीची सूचनाही देण्यात आली. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांनी पावसाळ्यापूर्वी व पावासाळ्यानंतर पुलांचे निरीक्षण करावयाचे असते. त्यानुसार त्यांनी आवश्यक त्या तपासणी सूची व निरीक्षण प्रपत्रे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुलांचे निरीक्षण, तपासणी करून या सर्व बाबी निरीक्षण नोंदवहीत नोंदविण्याचे निर्देश आहे. अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांनी त्यांच्या स्तरावर निरीक्षण करणे, नोंदवहीची तपासणी करणे आवश्यक आहे. गरज पडल्यास दोष दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळाची मदत घेता येणार आहे. (शहर प्रतिनिधी)पावसाळ्यानंतर सूचनांच्या अंमलबजावणीचे निर्देशग्राम विकास व जलसंधारण विभागाने केलेल्या या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सहसचिव दि. ग. मोरे यांनी दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनीच आपल्या स्वाक्षरीनिशी निर्गमित केलेल्या पत्रात यावेळी पावसाळा सुरू झाला असला, तरी पावसाळ्यापूर्वी करावयाची तपासणी, निरीक्षणे आता लगेच करण्याचे निर्देश दिले आहेत. निरीक्षणे, तपासणी, दुरूस्तीचे हे पत्र गेल्या २ आॅगस्टच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर ८ आॅगस्टला निर्गमित करण्यात आले आहे.
पावसाळा संपताना पुलांची तपासणी
By admin | Updated: September 29, 2016 01:11 IST