पूर्वी होते व्यापाऱ्यांचेच हित : पाच वर्षांत उत्पन्नात मोठी घसरणकळंब : शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु यापूर्वी बाजार समितीने शेतकऱ्यांऐवजी व्यापाराचे हीत जोपासले. त्यामुळे बाजार समिती डबघाईस आली. आता समितीला सक्षम करण्याचे मोठे आव्हान नवीन संचालक मंडळापुढे उभे ठाकले आहे. मागील पाच वर्षामध्ये बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी घसरण झाली. पूर्वी व्यापारी मंडळी खासगीमध्ये परस्पर शेतमाल खरेदी करायचे. परिणामी बाजार समितीचा सेस बुडविला जायचा. मागील वर्षी १९ ते २० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच १८ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचा उच्चांक गाठला. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली जात आहे. यावरुन खासगी शेतमाल खरेदीत प्रामाणिकपणे अटकाव केल्याचे दिसून येते. असे असले तरी बाजार समितीला उतरती कळा थोपवून त्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोन डझनापेक्षा जास्त व्यापाऱ्यांची याठिकाणी नोंद आहे. परंतु हर्रासवर केवळ दोन ते चारच व्यापारी बोलीसाठी हजर असतात. हर्रासावरील व्यापाऱ्यांची संख्या वाढविल्यास याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. मागील पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करीत केवळ बांधकाम व कर्मचारी भरतीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी असलेला शिदोरी मंडप अजूनही नावापुरताच आहे. तेथेही सुविधा निर्माण कराव्या लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
कळंब बाजार समितीच्या सक्षमतेचे संचालकांपुढे आव्हान
By admin | Updated: November 11, 2016 02:14 IST