लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासन निर्देशानुसार, जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा गुरुवारपासून ‘ऑफलाईन’ भरणार आहेत; मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्यात सर्वच शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करवून घेण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे निर्माण झाले आहे. यासंदर्भात मंगळवारी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्याची सूचना केली आहे; परंतु जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. १५ जुलैला शाळा सुरू करण्याचे आदेश असल्याने या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी १४ जुलै या एकाच दिवसभरात आटोपण्याचे आव्हान आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी तालुकानिहाय नियोजन करण्याचे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याकरिता मंगळवारी तातडीने प्रत्येक तालुक्यातील आठवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा आदींबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेने मागविला. यातील किती कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली, याचीही आकडेवारी मागविण्यात आली. आता संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून १०० टक्के शिक्षकांची टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र एकाच दिवसात हजारो शिक्षकांची कोरोना चाचणी करताना तालुका आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेत संघटनांची बैठक - १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. तर दुसरीकडे प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी उफाळून आल्या आहे. दोन वर्षांपासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती आता ऐरणीवर आणली गेली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कक्षात १५ जुलैलाच तब्बल २२ शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. यात पदोन्नतीसह आगामी काळातील प्राथमिक शाळांच्याही नियोजनावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.