यवतमाळ : रूई घोटाळ्यावरून सुमारे आठ वर्षांपासून काळ्या यादीत टाकलेल्या पांढरकवडा येथील कापूस खरेदी केंद्राला सीसीआयने अखेर क्लिन चीट दिली आहे. यंदाच्या हंगामापासून या केंद्राला काळ्या यादीतून वगळण्यात आले असून तेथे सीसीआयची कापूस खरेदी १६ नोव्हेंबरनंतर सुरू केली जाणार आहे. पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरु झाले असताना सीसीआयला विलंब का म्हणून मुख्यमंत्र्यांनी सीसीआयच्या महाव्यवस्थापकांवर दबाव वाढविला होता. त्यामुळे तत्काळ तीन केंद्र सुरू करण्यात आले असून विदर्भात आणखी २७ केंद्र १६ नोव्हेंबरनंतर सुरू केले जाणार आहे. त्यात आता पांढरकवडा येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राचाही समावेश केला जाणार आहे. सन २००६-०७ ला या कापूस खरेदी केंद्रावर रूई गठाणींमध्ये हेराफेरी केली गेली होती. या प्रकरणात ग्रेडर व व्यापाऱ्यांविरुद्धही गुन्हा नोंदविला गेला होता. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अनेक महिने या गुन्ह्याचा तपास चालला. एक क्ंिवटल कापसात ३६ किलो रूई निघत असताना प्रत्यक्षात ती ३४ किलो दाखवून प्रति क्ंिवटल दोन किलो रूईची ‘मार्जीन’ ठेवत हा घोटाळा करण्यात आला होता. तेव्हापासून सीसीआयने हे केंद्र काळ्या यादीत टाकले. या घोटाळ्यामुळे पांढरकवड्यातील अनेक जिनिंग मालकांनी सीसीआयची कापूस खरेदी करण्यास नंतरची काही वर्षे नकार दिला होता. काळ्या यादीतून बाहेर काढून हे केंद्र सुरू करावे म्हणून आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार केला होता. या केंद्रासाठी तोडसाम यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फतही प्रयत्न चालविले होते. अखेर त्याला यश आले. पांढरकवड्यात आता सीसीआयचीही कापूस खरेदी अनेक वर्षानंतर सुरु होणार आहे. या कापूस खरेदीची पांढरकवड्यातील जिनिंग मालकांनी तयारीही दर्शविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सीसीआयने पांढरकवडा केंद्र काळ्या यादीतून हटविले
By admin | Updated: November 11, 2015 01:39 IST