वणी : वणी-घोन्सा मार्गावरून पाच वाहनाद्वारे ३२ जनावरांची तस्करी करणाऱ्या पाच वाहनासह पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.शेख अफसर शेख कासम (३०), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री एम.एच.२९-ए.टी.०२८५, एम.एच.३४-एम.८८८५, एम.एच.३४-ए.बी.५२४३, एम.एच.२९-टी.६६०३ व एम.एच.२९-पी.६५९८ या पाच वाहनांनी ३२ म्हशी व जनावरे नेत असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या पवन शर्मा यांनी वणी पोलिसांना दिली. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दिलीप सायरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वणी-घोन्सा मार्गावर या वाहनाचा पाठलाग करून पाचही वाहन अडविले. पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता, त्यात तब्बल ३२ जनावरे आढळून आली. या जनावरांना कोणताही चारापाणी न देता अत्यंत निर्दयपणे कोंबून कत्तलखान्याकडे नेण्यात येत होते. पोलिसांनी वाहन अडविताच तेथून सर्व आरोपी फरार झाले व शेख अफसर शेख कासम हा पोलिसांच्या बेडीत अडकला. शनिवारी पहाटेच्या सुमारास हे पाचही वाहन येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी शेख अफसर शेख कासमविरूद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ कलम २७९ व कलम ११ (१) घ.ड.झ.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या सर्व जनावरांची येथील गोरक्षणात रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
३२ जनावरे वाहून नेणारी पाच वाहने ताब्यात
By admin | Updated: April 24, 2016 02:31 IST