यवतमाळ : चारचाकी, दुचाकी वाहनांच्या नंबरप्लेटवर नंबर लिहीण्याचे परिवहन विभागाचे विशिष्ट नियम आहेत. या नियमांना डावलून नंबर ओळखायला येणार नाहीत या पद्धतीने त्याचे विद्रुपीकरण केले जात आहे. अनेकदा गंभीर स्वरुपाचा अपघात झाल्यानंतर सदर वाहनाची ओळख पटविणे कठीण जाते. त्यामुळे नंबर प्लेटचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांना केल्या. यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नंबरप्लेटवरील विद्रुपीकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासंबंधी वारंवार तक्ररीही होतात. त्याची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेची माहिती घेतांना परिवहन विभाग व जिल्हा वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस.एन. झोळ, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन. देशमुख, जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक व्ही.एस. वांदिले आदी उपस्थित होते. सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांवर दादा, भाऊ, आई, बाबा, राम, मामा, राज, चाचा असे शब्द लिहून नंबरचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महागड्या कारवरही असे प्रकार आढळुन येतात. सदर प्रकार परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन आहे. अशी नावे नोंदविलेल्या वाहनाने अपघात केल्यास वाहन पसार होते आणि नंतर त्याचा शोध घेणे कठीण जाते. शिवाय हा प्रकार सुरक्षा नियमांच्या अनुषंगानेही योग्य नसल्याने अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी असे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे दोन्ही विभागांनी विशेष मोहीम आखली असून वाहतूक शाखा जिल्हाभर अशा नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमाचे पालन करावे असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
नंबरप्लेटवरील विद्रुपीकरण थांबविण्यासाठी मोहीम राबवा
By admin | Updated: January 23, 2015 00:14 IST