यवतमाळ : ‘बीएसएनएल बचाओ-राष्ट्र बचाओ’ असा नारा देत भारत संचार निगमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या अंतर्गत बुधवारी येथे निदर्शने केली. बीएसएनएलच्या अस्तित्वासाठी ही लढाई असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. शासनाच्या चुकीच्या धोरणाचे बळी भारत संचार निगम करत आहे. कुशल व अनुभवी तंत्रज्ञ असतानाही सामान्य नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळत नाही. भारत संचारला डावलून सरकार केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्याचा विचार करत आहे. त्यांनाच नवीन सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे मत या नेत्यांनी मांडले. आवश्यक उपकरणांची खरेदी त्वरित करावी, निदेशकांची रिक्त पदे भरावी, ४-जी सेवा प्रदान करण्याचा अधिकार द्यावा, स्पेक्ट्रमचे वाटप करताना उदार धोरण ठेवून बीएसएनएलकडून लायसन्स फी माफ करावी शिवाय मागील सहा हजार ७०० कोटी रुपये परत करावे, केंद्र-राज्य तथा पीएसयूला बीएसएनएलकडून सेवा घेणे अनिवार्य करावे, बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही तोट्यातील उद्योगांचे विलिनीकरण करू नये, बीएसएनएलच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी आहे. बंदमध्ये भारत संचारचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. बंदचे नेतृत्व नॅशनल फेडरेशन टेलिकॉम एम्प्लॉईज अधिकारी संघटनेचे नरेंद्र गद्रे, जिल्हाध्यक्ष सुनील बेनोडेकर, जिल्हा सचिव शंतनू शेटे यांनी केले. (वार्ताहर)
‘बीएसएनएल’ कर्मचाऱ्यांचा संप
By admin | Updated: April 23, 2015 02:14 IST