यवतमाळ : चहुबाजूचे दडपण झुगारीत जिल्हा प्रशासनाने आपली अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम ठेवली. दिवसाअखेर ३०० दुकाने भुईसपाट केली आणि याच बरोबर अनेक दिवसांपासून गुदमरलेल्या प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यवतमाळ नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, दूरसंचार विभाग, पोलीस अािण वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. १२ वाहनांच्या मदतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही मोहीम फत्ते करण्यात आली. आर्णी नाक्यापासून या मोहिमेला सकाळी प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही मोहीम थांबली. आर्णी मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय आहे. अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाचा बुलडोझर थांबविण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणचे साहित्य स्वत:च हलविले. कार्यालयाचे अतिक्रमण स्वत: काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोहीम पुढे सुरू झाली. (शहर वार्ताहर)
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By admin | Updated: January 5, 2015 23:11 IST