साने गुरुजीनगर : मृतदेह जाळून विहिरीत फेकलायवतमाळ : २५ ते ३० वर्षे वयोगटातील अज्ञाताचे दोन्ही पाय व हातांचे पंजे छाटून निर्घृण खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. हा अर्धवट जळालेला मृतदेह लोहारा-वाघापूर मार्गावरील साने गुरुजीनगर परिसरातील एका सार्वजनिक विहिरीत आणून टाकण्यात आला. मृतदेह नेमका पुरुषाचा की स्त्रीचा हेही ओळखता येणे शक्य झाले नाही. मृतकाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्त्याराने वार करून खून केल्याचा अंदाज आहे. शनिवारी पहाटे ही घटना उजेडात आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. खून झालेला कोण? याचा शोध घेण्याचे, त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. लोहारा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. घटनास्थळावर अमरावती येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान रॉकी व हॅन्डलर ईश्वर बारबुद्धे यांनी विहिरीच्या काठावरचे आर्टीकल गोळा केले. मात्र श्वान तेथेच घुटमळले. साने गुरुजीनगर परिसरातील सार्वजनिक विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याचे अरविंद वीरखेडे यांना शनिवारी सकाळी ७ वाजता आढळले. त्यांनी लोहारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला असता त्याचे काही अवयव गायब असल्याचे व तो अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. एसडीपीओ पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख व पथकाने घटनास्थळी भेट दिली. खून करून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील हा मृतदेह विहिरीमध्ये आणून टाकण्यात आला. वेगळ्याच ठिकाणी खून करून व नंतर जाळण्याचा प्रयत्न करून हा मृतदेह या विहिरीत रात्रीला आणून टाकला असावा, घटनास्थळी वाहनाच्या चाकांचे ठसे न दिसल्याने वाहन रस्त्यावर उभे करून हा मृतदेह विहिरीपर्यंत आणण्यात आला असावा, त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. हरवलेल्या नोंदींवर लक्ष केंद्रितगेल्या २४ तासात यवतमाळ जिल्ह्यात किंवा शेजारील जिल्ह्यांमध्ये कुणी हरवल्याची, अपहरण झाल्याची नोंद आहे का, यावर पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)मृताचे दोन्ही पाय-पंजे गायब, ओळख पटविण्याचे आव्हानसाने गुरुजीनगर परिसरातील विहिरीमध्ये आढळलेल्या अज्ञात मृतदेहाचे गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडलेले आहेत. शिवाय दोन्ही हातांचे पंजेही तोडण्यात आले आहे. हे तुटलेले पाय व पंजे गायब आहेत. ते परिसरात अन्य कुण्या ठिकाणी पडले आहेत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. त्या माध्यमातून या प्रकरणातील नेमक्या घटनास्थळाचा सुगावा लावण्याचा प्रयत्न लोहारा व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस करीत आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान लोहारा पोलिसांपुढे आहे. त्यानंतरच या खुनाचे रहस्य उलगडणार आहे.
लोहारा-वाघापूर बायपासवर अज्ञाताचे हातपाय तोडून खून
By admin | Updated: March 26, 2017 01:13 IST