मित्रच निघाले मारेकरी : पैशाचा वाद, तिघांना अटक यवतमाळ : येथील सानेगुरुजीनगरात शनिवारी आढळलेल्या अज्ञात प्रेताची ओळख पटवून गुन्ह्याचा छडा अवघ्या २४ तासात लावण्यात पोलिसांना यश आले. सदर तरुण लोहारा येथीलच असून त्याच्या जवळच्या मित्रांनीच पैशाच्या वादातून खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात लोहारा येथील तिघांना अटक केली आहे. लोहारा-वाघापूर बायपासवरील सानेगुरुजीनगरातील विहिरीत हातपाय तोडलेला आणि जळालेल्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी आढळून आला होता. ओळखीची कोणतीही खूण नाही की नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये कुणी हरविल्याची तक्रारही नाही, अशा परिस्थितीत शोध लावण्याचे आव्हान पोलिसांनी अवघ्या २४ तासात पूर्ण केले. सतीश राजाराम डोईजड (४५) रा. दत्तात्रेयनगर, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. तर अमित राजकुमार यादव (२७) रा. देवीनगर, गौरव भारत उमाटे (२२) रा. सप्तश्रृंगीनगर, सुरज बाबाराव बोंदरे (२३) रा. शिवनगर लोहारा, अशी आरोपींची नावे आहेत. सतीश आणि आरोपी मित्र होते. त्यांनी पैशाच्या वादातून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय करणारा सतीश येथील दत्तात्रेयनगरात राहत होता. काही वर्षापूर्वी पत्नीचा आणि तीन महिन्यांपूर्वी मुलाचा मृत्यू झाल होता. बुधवारी रात्री त्याने मित्र अमित यादव, गौरव उमाटे यांना पार्टीसाठी घरी बोलाविले. रात्री ११ वाजता पैशावरून वाद झाला. त्यानंतर अमित व गौरव यांनी बाहेर जाऊन दारू आणली. पुन्हा वाद उकरून अमितने सतीशला मारहाण केली, सतीशनेही त्याचा प्रतिकार केला. यात गौरवने सतीशच्या डोक्यात दगड मारल्याने तो बेशुद्ध पडला. प्रकरण अंगाशी येईल या भीतीने त्या दोघांनी सतीशला दुचाकीवर बसवून एमआयडीसी परिसरातील निर्जनस्थळी आणले. तेथे त्याच्या डोक्यावर लाकडी ओंडक्याने प्रहार केले. दुचाकीतील पेट्रोल टाकून मृतदेह जाळला आणि दोघेही परत आले. त्यानंतर गुरूवारी पहाटे एकवीरा चौक परिसरात पानटपरी चालक सुरज बोंद्रे याच्या मदतीने मृतदेह आॅटोरिक्षातून सानेगुरूजीनगरातील विहिरीत फेकून दिला अशी कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, एसडीपीओ पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात टोळीविरोधी पथकाचे प्रमुख प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, जमादार ऋषी ठाकूर, संजय दुबे, बंडू मेश्राम, किरण पडघन, गजानन धात्रक, विनोद राठोड, अर्पिता चौधरी, साजीद शेख, अजय डोळे, गणेश देवतळे आदींनी ही कारवाई केली. तिघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास लोहाराचे ठाण्याचे सहायक निरीक्षक अभय आष्टेकर करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) बेपत्ता सतीशच्या चर्चेतून लागला सुगावा सतीश डोईजड हा बुधवारपासून घरातून बेपत्ता असला तरी त्याची तक्रार कुठेही करण्यात आली नाही. मात्र मित्रमंडळीत त्याच्या गायब होण्याबाबत तर्कविर्तक सुरू होते. तितक्याच जळालेला बेवारस मृतदेह आढळल्याने या चर्चेला चांगलेच पेव फुटले. पोलिसांनी हाच धागा पकडून तपासाची दिशा निश्चित केली. घटना उघडकीस आल्यानंतर केवळ २४ तासातच आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली. मृतदेहाची डीएनए चाचणी करणार सतीश डोईजड यांचाच जळालेला मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कायदेशीर निश्चित करण्यासाठी या मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार आहे. तूर्त तरी अटकेतील आरोपींच्या कबुलीवरून हा मृतदेह सतीश डोईजड यांचाच असल्याची नोंद घेण्यात आली आहे. एसपींची पत्रपरिषद लोहारा-वाघापूर बायपासवरील सानेगुरुजीनगरातील विहिरीत आढळलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आणि बिटरगावातील व्यापाऱ्याचा खून या दोनही घटनांचा पोलिसांनी अवघ्या २४ तासात शिताफीने छडा लावून आरोपींना अटक केली. याची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सोमवारी दुपारी पत्रपरिषदेत घेतली. विहिरीत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात पोलिसांनी आपले कौशल्य व तंत्रज्ञान वापरुन हा गुन्हा उघडकीस आणला. या तपास पथकाला विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून बक्षीस देऊन गौरविण्यात येणार असल्याचे एसपींनी सांगितले.
खून करून जाळलेला ‘तो’ मृतदेह लोहारातील
By admin | Updated: March 28, 2017 01:19 IST