नेर : माहेरी असलेल्या पत्नीजवळून एक वर्षीय मुलाला सोबत नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा लाकूड आणि फळीने मारून खून करण्यात आला. ही घटना धनज (माणिकवाडा) येथे शुक्रवारी रात्री २.३० वाजता घडली. या प्रकरणी पत्नीसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. सादीक शेख गुलाब उमर (२८) रा.रचना ले-आऊट यवतमाळ, असे मृताचे नाव आहे.सादीकचा विवाह तीन वर्षांपूर्वी धनज येथील नाझिया (२५) हिच्याशी झाला होता. त्यांना एक अपत्य झाले. गेली एक वर्षांपासून या दाम्पत्यात वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्याने नाझीया एक वर्षांपासून माहेरी धनज येथे आहे. मात्र तो मुलाला नेहमी भेटायला जायचा. दरम्यान, गुरुवारी तो धनज येथे गेला. रात्री २.३० वाजता त्याने मुलाला सोबत नेण्यासाठी आग्रह धरला. यावर वाद होवून त्याचे पर्यवसान हल्ल्यात झाले. यात रक्तबंबाळ झालेल्या सादीकचा जागीच मृत्यू झाला. प्रकरणी पत्नी नाझीया सादीक शेख (२५), सासरा अब्दुल रशीद अब्दुल कदीर (५८), सासू झाकीया अ.रशीद उमर (५५), साळा अ.राजीक अ.रशीद उमर (१९), अ.शाकीब अ.रशीद उमर (२३) आणि शेजारी अ.गफार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान सादीकच्या खिशात एप्रिलमध्ये यवतमाळ पोलिसात केलेल्या तक्रारीची प्रत आढळून आली. घटनेचा तपास ठाणेदार गणेश भावसार, उपनिरीक्षक रंगनाथ जगताप, हरिचंद्र कार, वैशंपाल इंगोले, श्रीकृष्ण गुल्हाने, राजेश चौधरी, रामधन पवार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुलाच्या ताब्यावरून धनज येथे जावयाचा खून
By admin | Updated: June 21, 2014 02:08 IST