दारव्हा येथे अविरोध निवड : दोनही स्वीकृत सदस्य शिवसेनेचे दारव्हा : सोमवारी पार पडलेल्या नगरपरिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या प्रीती जयसिंगपुरे अविरोध निवडून आल्या. सेनेने दोनही स्वीकृत सदस्यपद आपल्या ताब्यात घेतले असून, त्यावर प्रकाश गोकुळे आणि शरद गुल्हाने यांची वर्णी लागली. नगरपरिषद सभागृहात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सभेचे पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष बबनराव इरवे होते. उपाध्यक्षपदासाठी प्रीती जयसिंगपुरे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेनेकडून प्रकाश गोकुळे, पुंडलिकराव चिरडे, सैयद निसार, रूपेश गुल्हाने, प्रकाश उरकुडे, तर भाजपाकडून राजेश खिवसरा, सुधीर अलोणे, शरद गुल्हाने, आनंद झोळ यांचे अर्ज दाखल झाले होते. यापैकी सुधीर अलोणे, रूपेश गुल्हाने व प्रकाश उरकुडे यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. अपक्ष अर्ज दाखल करणारे बाबा कव्हळकर यांचे नाव तोलिक संख्याबळ नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांमधील शिवसेना गटाकडून प्रकाश गोकुळे तर भाजपा गटाकडून शरद गुल्हाने यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे शरद गुल्हाने शिवसेनेचे कार्यकर्ते आहे. मात्र सेना-भाजपा युतीत दोनही गटाचे स्वीकृत सदस्यपद सेनेने आपल्याकडे घेतल्याने या ठिकाणी भाजपाच्या शिफारसीवर शिवसेना कार्यकर्त्यांची वर्णी लागली. (तालुका प्रतिनिधी) सेनेची भाजपावर कूरघोडी ४दारव्हा नगरपरिषदेमध्ये सेना-भाजपाची युती झाली असली तरी, भाजपाच्या वाट्याचे स्वीकृत सदस्यपद सेनेने आपल्याकडे खेचून घेतल्याने सेनेने भाजपावर कूरघोडी केल्याची चर्चा आहे. हक्काचे पद सोडल्याने भाजपाच्या इच्छुक कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असल्याने एका कार्यकर्त्याला अॅडजेस्ट करून पालिकेतील संख्याबळ वाढविण्याची चांगली संधी गमावल्याचे बोलले जाते आहे. काँग्रेस, सपा नगरसेवक अनुपस्थित ४उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवड सभेला काँग्रेसचे चार आणि समाजवादी पार्टीचे दोनही नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे शिवसेना आठ, भाजपा पाच आणि अपक्ष एक अशा १४ नगरसेवकांच्या उपस्थितीत सभा पार पडली.
नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपच्या प्रीती जयसिंगपुरे
By admin | Updated: January 10, 2017 01:26 IST