जि.प., पं.स.निवडणूक : विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपाच्या छावणीतसंतोष कुंडकर वणीलोकसभा, विधानसभेनंतर नगरपालिकांवरही झेंडा फडकविणाऱ्या भारतीय जनता पार्टीची राजकारण्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. येत्या १६ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी भाजपाच्या तंबूत ईच्छूकांची गर्दी झाली आहे. विविध राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते भाजपाच्या छावणीत दाखल होत असले तरी नोटाबंदीचा फटका सहन करणारा ग्रामीण मतदार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपा कौैल देणार का, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांच्या गोटात चर्चिला जात आहे. बुधवारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. निवडणुकीला उणापुरा एक महिना आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा, विधानसभेनंतर राज्यातील बहुतांश नगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीने सत्ता प्राप्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्या ताब्यात असाव्या, यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी भाजपाने आतापासूनच व्यूहरचना आखली आहे. भाजपाचे राजकीय यश लक्षात घेता विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर आहेत. काहींनी अधिकृत प्रवेशदेखील घेतला आहे. यामुळे भाजपाची ताकद वाढत असली तरी नोटाबंदीनंतर प्रचंड त्रास सहन करणारा ग्रामीण मतदार काय भूमिका घेते, याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणात भाजपाला फारशी मुसंडी मारता आली नाही. वणी तालुक्यातील चार जि.प.व आठ पं.स गणांपैकी एक जि.प.व एक पंचायत समिती गण भाजपाला ताब्यात घेता आला. या उलट या तालुक्यात शिवसेनेचेच प्राबल्य राहिले आहे. आता आगामी निवडणुकीत सेनेच्या अस्तित्वाला भाजपाकडून कशा पद्धतीने सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जाईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मारेगाव व झरी तालुक्यातही भाजपाची हिच अवस्था होती. त्यामुळे आता भाजपाला कॉंग्रेस, शिवसेना व मनसेला शह देण्यासाठी फार मोठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून काही पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत. नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे जुने निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. नव्याने पक्षात दाखल झालेले पदाधिकारी तिकीटाची अपेक्षा ठेऊन आहेत. त्यामुळे तिकीट वाटप करताना निष्ठावानांची मर्जी सांभाळताना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे.
उमेदवारीसाठी भाजपालाच अधिक पसंती
By admin | Updated: January 13, 2017 01:36 IST