संजय भगत महागावमहागाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला उमेदवार मिळाले नाही. अखेर सेनेतून काही आयात केले. तर काही प्रभागात तालुका विकास आघाडीची मदत घेण्यात आली. असे १७ उमेदवार भाजपाने उभे केले. बहुतांश ठिकाणी उभे असलेले उमेदवार ‘दादा गटा’चे आहेत. ते आज कमळ घेऊन उभे असले तरी उद्या ते कमळाची फटफजिती करणार नाही याची कोणी हमी घेऊ शकत नाही. म्हणूनच पाहिजे तो विश्वास या आघाडी व त्या राष्ट्रीय पक्षावर राहिला नाही. याचा अंदाज आल्यामुळे भाजपाने आघाडीची रसद बंद केल्याची चर्चा आहे. तालुका विकास आघाडी मूळ काँग्रेस विचाराची आहे. परंतु स्वाभिमान दुखावल्याने आघाडीचे प्रमुख भाजपासोबत गेले. भाजपात सर्व काही मनासारखे होईल, असे वाटत असताना आमदारांनी आघाडीच्या नेत्याला फार काही महत्व दिले नाही. आघाडीचा आम्हाला पाठिंबा आहे तो त्यांनी स्वत:हून आम्हाला दिला आहे. तो त्यांनी द्यावा किंवा काढून घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे भाजपाचे काही शिलेदार बोलून दाखवीत आहे. हे बोलणे सहज असले तरी त्यातूनच आघाडी प्रमुखाला तो नकळत इशारा आहे. तुमचे भाजपात तेवढे स्थान नाही तुम्ही केवळ पाठिंबा दिलेला आहे. ही कुण कुण लागताच आघाडीत अस्वस्था पसरली आहे. तर दुसऱ्या बाजूला आघाडीचे प्रमुख ‘दादा’ यांच्या विषयी काँग्रेसने आजही मान-सन्मान कमी केला नाही. काँग्रेसच्या प्रत्येक भाषणात दादांचा उल्लेख आदरणीय म्हणूनच केला जातो. काँग्रेसचे खरे पाईक दादा भाजपात किती दिवस रमतात हेच महत्वाचे आहे. विकासाचा साक्षात्कार झाला की दादा तालुका विकास आघाडीचे हत्यार उपसून केव्हा कोणासोबत जातील याचा अंदाज बांधता येत नाही. राजकीय, सहकारातील जाणते आदरणीय नेतृत्व असूनही वेळ प्रसंगी भरकटत असल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गळचेपी झाली आहे. ही वस्तू स्थिती असताना फरक एवढाच की त्याची वाच्यता सार्वजनिक ठिकाणी होत नाही. तर दुसरीकडे दादाचा घरवापसी हा भाजपाचा कुटील डाव उधळून लावण्याचा एकमेव रामबाण उपाय शोधला तर बरे होईल, अशी अपेक्षा अजूनही काँग्रेसला आहे. विकास आघाडीने पाठिंबा काढला तर भाजपा जवळ उरते तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. भाजपाच्या पडद्याआड तालुका विकास आघाडीचाच चेहरा सध्या दिसत आहे.
भाजपाच्या पडद्याआड विकास आघाडीचा चेहरा
By admin | Updated: October 28, 2015 02:42 IST