यवतमाळ : सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असताना भाजपा त्यात माघारल्याचे दिसते. अन्य पक्षांचे कार्यकर्ता मेळावे होत असलेतरी भाजपाला अद्याप अशा मेळाव्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन काँग्रेसने जिल्हा कार्यकरिणीची बैठक घेतली. ती वादळीही ठरली. त्यावरून नेत्यांना आगामी स्थितीचा अंदाज आला. त्यापूर्वी शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेतला. तो शांततेत पार पडला. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यात नेत्यांनी विधानसभेच्या दृष्टीने कामाला लागा, असा संदेश कार्यकर्त्यांना देताना वाढीव मतदारसंघावर आपला दावा सांगितला. परंतु या सर्व आघाड्यांवर भाजपात शांतता दिसून येते. पक्षाचा कुठे मेळावा किंवा बैठका नाही. बैठका झाल्या तरी एखादा नेता आपल्याच गटापुरत्या त्या मर्यादित ठेवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील भाजपा कार्यकर्ते पक्षाची आगामी रणनीती काय असा सवाल करताना दिसत आहे. कार्यकर्ता मेळाव्यासाठी भाजपाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. विधानसभेतील इच्छुक उमेदवार मात्र तयारीला लागले आहे. कदाचित ऐनवेळी त्यांना कार्यकर्त्यांचे स्मरण होईल, असे दिसते. भाजपाने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, तेवढीच एक भाजपाच्या गोटातील राजकीय उलाढाल आहे. कार्यकर्त्यांना संयुक्त बैठक, मेळाव्यांची प्रतीक्षा आहे. भाजपातील नेत्यांचे व इच्छुक उमेदवारांचे विविध गट सांभाळताना जिल्हाध्यक्षांची मात्र तारेवरची कसरत होत आहे, एवढे निश्चित. इतरांसाठी एबी फॉर्म मागणारे जिल्हाध्यक्ष या वेळी स्वत:साठीही एबी फॉर्म मिळतो का या दृष्टीने प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपाला बैठकीसाठी मुहूर्तच मिळेना !
By admin | Updated: June 21, 2014 02:07 IST