यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी पीक विम्याच्या मदतीतून शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते कापले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बँकर्स कमिटीला आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नाही तर पीक विम्यातून कर्ज कापले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत दिली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. मात्र जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे सरळ कर्ज खात्यात वळते केले. राज्य समितीच्या शिफारसीनंतर जिल्ह्यातील कर्ज वितरणाबाबत कपातीचे धोरण राबवित आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बॅकर्स कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी कर्जाबाबत विविध सूचना दिल्या. तसेच अनेक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्ज वितरणासाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे राज्य बँकेकडे अतिरिक्त कर्जाची मागणी करण्यात आली. या मागणीकडे राज्य बँकेने कानाडोळा केला. त्यामुळे मुबलक कर्ज वितरणासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असमर्थ आहे, असे या बैठकीत जिल्हा बँकेच्यावतीने सांगण्यात आले. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांनीही आपल्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य समितीच्या शिफारसीनुसारच कर्ज वितरित करण्याचे आदेश दिले. यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. (शहर वार्ताहर)
खबरदार ! पीक विम्यातून कर्ज कापाल तर...
By admin | Updated: April 29, 2015 02:20 IST