अखेर मृतदेहच सापडले : अवघ्या राजूरवर पसरली शोककळानांदेपेरा : वणी तालुक्यातील राजूर (कॉलरी) येथील दोन युवकांना पार्टी करणे जीवावर बेतले. शेलू (खु.) जवळील वर्धा नदीच्या पात्राजवळ पार्टी करायला गेलेल्या या दोन युवकांचे अखेर शुक्रवारी सकाळी मृतदेहच आढळले. या घटनेमुळे राजूर गावावर शोककळा पसरली आहे. गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास राजूर (कॉलरी) येथील नऊ युवक शेलू येथील वर्धा नदीच्या पात्राजवळ पार्टी करण्याकरिता गेले होते. त्यांनी प्रथम पार्टी केली. जेवण आटोपले. त्यानंतर बाबू ऊर्फ विजय मनोज परसराम (२७) हा युवक मासे पकडण्याकरिता नदीत उतरला. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आलाच नाही. त्यामुळे बाबू पाण्यात गटांगळ्या खावू लागला. त्याने आरडाओरड केली असता, त्याचा आवाज ऐकून त्याचा चुलत भाऊ भोला मुन्ना परसराम (३२) याने बाबूला वाचविण्यासाठी नदीत उडी मारली. मात्र तोसुद्धा पाण्यात बुडू लागल्याने त्यानेही आरडाओरड केली.यानंतर त्याचा मोठा भाऊ शिवराज मुन्ना परसराम याने या दोघांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र शिवराजलाही पाण्याचा अंदाज न आल्याने तोसुद्धा गटांगळ्या खावू लागला. त्यावेळी नदी काठावर त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या शंकर परसराम याने हातात असलेला टॉवेल शिवराजच्या हातापर्यंत पोहोचविला व त्याला कसेबसे नदी बाहेर काढले. मात्र तेवढ्यात भोला व बाबू मात्र दिसेनासे झाले. हा प्रकार लगतच्या गुराखी व शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीत दोर टाकून या युवकांचा शोध घेतला. ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली. तहसीलदार रणजीत भोसले, मंडळ अधिकारी जयंत झाडे, तलाठी प्राजक्ता केदार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सायरे आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र सायंकाळ झाल्याने त्या दोघांचा शोध घेता आला नाही. त्यामुळे शोधकार्य थांबले. शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास कवडू पेचे व सुर्तेकर यांच्या शेतालगत असलेल्या नदीकाठावर विजयचा मृतदेहच आढळून आला. त्यानंतर शेलू येथील मनोहर पारटकर व अविनाश पेंदोर या दोघांनी त्याला बाहेर काढले. मात्र भोलाचा तेव्हासुद्धा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे मंडळ अधिकारी झाडे यांनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन पाणबुडीला घटनास्थळी पाचारण केले. दोन तासानंतर घटनास्थळावरच भोलाचा मृतदेह आढळून आला. भोलाचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. मुर्लीधर दौलतकर, सुनील कुंटावार, वासुदेव नारनवरे, प्रमोद जिड्डेवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. गुरूवारपासून शुक्रवारी सकाळपर्यंत परिसरातील कोणताही लोकप्रतिनिधी दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)
पार्टी करणे बेतले दोघांच्या जीवावर
By admin | Updated: October 10, 2015 01:56 IST