आंदोलन : बंदी भागातील प्रश्नांवर बिटरगावात चर्चा उमरखेड : तालुक्यातील बंदी भागातील समस्या सोडविण्यासाठी मोरचंडी जंगलात उपोषणास बसलेल्या नागरिकांसाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू सोमवारी धावून आले. समस्या सुटल्याशिवाय बंदी भाग सोडणार नाही, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. अखेर प्रशासनाने नमते घेत बिटरगाव ठाण्यात चर्चा केली. सकारात्मक तोडगा काढण्यात आला. बंदी भागातील विविध समस्यांसाठी मोरचंडी जंगलात नागरिकांनी उपोषणाला प्रारंभ केला होता. स्थानिक आमदारासह प्रशासनानेही याची दखल घेतली नाही. अखेर प्रहारचे आमदार बच्चू कडू सोमवारी मोरचंडी येथे पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथूनच त्यांनी वन, महसूल आणि बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. समस्या सुटल्याशिवाय बंदी भाग सोडणार नाही, असे सांगितले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. बिटरगाव पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी आमदार विजय खडसे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, उपविभागीय वन अधिकारी अमोल थोरात, वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.आर. राठोड, वन हक्क व जंगल समितीचे भगवान देवसरकर, अनिल आडे, जीवन फोपसे, प्रमोद राठोड उपस्थित होते. त्यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. प्रशासनाने मागण्या मान्य केल्या. परंतु सध्या आचारसंहिता असल्याने तत्काळ उपाययोजना करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार कडू यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सकारात्मक तोडगा निघाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान मोरचंडी येथे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंदी भागातील सुमारे पाच हजार महिला उपस्थित होत्या. आंदोलनाची सांगता होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
बच्चू कडूंपुढे प्रशासन नमले
By admin | Updated: January 10, 2017 01:35 IST