यवतमाळ : पोलीस मुख्यालय संघाच्या अशोक राठोड याने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत व लांब उडीत तर साहेबराव राठोड याने थाळीफेक, भालाफेक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावून मैदानी स्पर्धा गाजविली. पोलीस मुख्यालय संघाने फुटबॉल स्पर्धेत दारव्हा संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.येथील पोलीस मुख्यालयाच्या वतीने २६ ते २८ आॅगस्टपर्यंत जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नेहरुस्टेडियमवर गुरुवारी घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अशोक राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सागर चिरडे याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. १५०० मीटरच्या शर्यतीत गौरीशंकर तेलंगे अव्वलस्थानी राहिले. लांब उडीत अशोक राठोड, गौरीशंकर तेलंगे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. गोळाफेकमध्ये पंकज पाजूरकर विजयी ठरले. तर सागर मेश्राम उपविजयी झाले. थाळीफेकमध्ये साहेबराव राठोड अव्वलस्थानी राहिले. मोहम्मद एजाज दुसऱ्या स्थानी राहिले. भालाफेकमध्येही साहेबराव राठोड याने सर्वाधिक लांबीवर भाला फेकून विजेतेपद पटकावले. सचिन फुंडे उपविजयी ठरला. पोलीस अधिकारी विरुद्ध पत्रकार एलेव्हन संघात व्हॉलिबॉलचा सामना घेण्यात आला. यात पोलीस संघाने पत्रकार संघाचा सरळ दोन सेटमध्ये दारुण पराभव करीत विजयी साजरा केला. दुसऱ्या एका मैत्रीपूर्ण सामन्यात मास्टर्स संघाने वैद्यकीय अधिकारी संघाचा पराभव केला.फुटबॉल खेळाचा अंतिम सामना पोलीस मुख्यालय विरुद्ध ज्वालाक्रांती दारव्हा संघात झाला. अटीतटीच्या या सामन्यात पोलिस मुख्यालयाच्या अमित वर्माने नोंदविलेल्या एकमेव गोलने मुख्यालय संघाने एक विरुद्ध शून्य गोलने पराभव करुन विजेतेपद पटकावले. कबड्डीच्या साखळी सामन्यात नेर संघाने आसेगाव संघाचा तब्बल २७ गुणांनी पराभव केला. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. या स्पर्धेत पंच म्हणून बापू रामटेके, गजानन चौधरी, सचिन जयस्वाल, सैय्यद लुकमान, गणेश गटलेवार, किनवटकर, आदित्य राठोड, प्रवीण कळसकर, करण वरखडे यांनी काम पाहिले. अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उपअधीक्षक पी. डी. डोंगरदिवे, राखीव पोलीस निरीक्षक दत्तात्रय भंडारवार, उपनिरीक्षक कमलाकर घोटेकर, क्रीडा शिक्षक मोरेश्वर गोफने यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा होत आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
अशोक, साहेबराव यांनी गाजवले मैदान
By admin | Updated: August 28, 2015 02:39 IST