भीम टायगर सेना : तीव्र आंदोलनाचा इशारा यवतमाळ : दादर (मुंबई) येथील आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस उद्ध्वस्त करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन भीम टायगर सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पीपल्स इम्प्रुव्हमेंटचे तोतया ट्रस्टी आणि रत्नाकर गायकवाड यांनी ऐतिहासीक मूल्य असलेल्या या वास्तू बेकायदेशीररीत्या जमिनदोस्त केल्या. याविषयी नागरिकात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. निवेदने, मोर्चा, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने करूनही वास्तू पाडणाऱ्यांना अटक करण्यात आली नाही. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे रत्नाकर गायकवाड आणि पीपल्स इम्प्रुव्हमेंटच्या ट्रस्टींना तत्काळ अटक करा, असे या निवेदनात म्हटले आहे. सदर वास्तू पाडणाऱ्यांना पकडण्यासाठी शासनाकडूनही विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन सादर करताना भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव कांबळे, जिल्हा संपर्क प्रमुख सुमेध पेटकर, जिल्हा उपाध्यक्ष श्याम मेश्राम, शहर संघटक अक्षय खोब्रागडे, शहर प्रमुख कोमल जोगळेकर, पराग मेश्राम, मंगेश दहीकर, मुन्ना रामटेके, अमित शिरभाते, अनुप उके, अनिल रामटेके, अंशुमन गायकवाड, आशीष वाणी, नितीन मेश्राम, मदन वरघट, राहुल सहारे, नीलेश बोंगाडे, आशीष शेळके आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
आंबेडकर भवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना अटक करा
By admin | Updated: July 13, 2016 03:09 IST