गारपीटग्रस्तांची मागणी : अडकोलीचे शेतकरी लाभापासून वंचित, मनसेचा पुढाकारवणी : झरीजामणी तालुक्यातील अडकोली येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान देण्यात न आल्याने सोमवारी मनसेच्या नेतृत्वात गारपीटग्रस्तांनी तहसीलदारांना घेराव घालून मदतीची मागणी केली़ अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी यापूर्वी वारंवार तहसीलदारांना निवेदन दिले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली होती़ मात्र त्यावर कोणताही विचार करण्यात आला नाही. प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा अवलंबला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांना आपली व्यथा सांगितली. सोमवारी राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी झरी येथे धाव घेतली. तेथे तहसीलदारांना घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या़ मागील वर्षी अडकोली परिससरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ मात्र तलाठी सुरपाम व कोतवाल ज्ञानेश्वर मेश्राम यांनी काही श्ोतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. मदतीसाठी त्यांनी पैशाची मागणी केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी दिले. त्यांचे नाव अनुदानासाठी समाविष्ट करण्यात आले. मात्र ज्यांनी तलाठ्याला पैसे दिले नाही, त्यांना अद्याप अनुदानाचा अद्याप लाभ मिळाला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.अखेर सोमवारी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी उंबरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना घेराव घातला़ त्यानंतर तहसीलदारांनी शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश दिले. अडकोली, डोंगरगाव, पवनार, गणेशपूर (खु़) या गावातील गारपीटग्रस्तांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे त्यांनी आदेश दिले़ या चौकशीसाठी निवासी नायब तहसीलदार टी़डी़ बोंगीरवार, मंडळ अधिकारी एम़व्ही़ घोडे, तलाठी पी़एस़ ढवळे यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचे आदेश हाती पडल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर चौकशी अधिकाऱ्यांकडून शेतकरी आता मदतीची प्रतीक्षा करीत आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
मदतीसाठी तहसीलदारांना घेराव
By admin | Updated: December 9, 2014 22:59 IST