झरी : यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा, या मागणीला घेवून येथील तहसील कार्यालयाला शेकडो महिलांनी घेराव घातला आणि काही काळ प्रशासकीय कामे ठप्प पडली होती. हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गावरचे दारू दुकाने ंद करावे, उर्वरित दारू दुकानेही बंद करून जिल्हा दारूबंदी घोषित करावा, अशी मागणी यावेळी महिलांनी लावून धरली होती. जनतेला व्यसनमुक्त करायचे काम सरकारचे आहे. परंतु नवीन दारू दुकानाचे परवाने देवून राज्यात ठिकठिकाणी सरकार दारू उपलब्ध करून देत आहे. सरकारचे हे धोरण चुकीचे आहे. या धोरणाचा स्वामिनीचे संयोजक महेश पवार यांनी निषेध केला. तालुका संयोजक राम आईटवार यांच्या नेतृत्वात विश्रामगृहापासून हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचताच घोषणाबाजी करून नायब तहसीलदारांना निवदेन दिले. यावेळी शोभा गडेवार, प्रतिभा लेनगुरे, सुपायत शेख, गीरजा येडमे, वर्षा करगलवार, रमेश हलालवार, निर्मला दातारकर, आकूलवार, विमल सोयाम आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
दारूबंदीसाठी स्वामिनींचा झरी तहसीलला घेराव
By admin | Updated: March 10, 2017 01:16 IST