जिल्हा परिषद : निवडणूक होणार लक्षवेधी महागाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वी महागाव तालुक्यातील काळी दौ. जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी चूरस निर्माण झाली आहे. आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांचे या मतदारसंघावर लक्ष लागले असून पुसद वरून काही तरुण चेहरे आपले नशीब आजमावण्यासाठी उतरण्याची शक्यता आहे. काळी दौ. जिल्हा परिषद मतदारसंघातील गणात भाजप सेना आणि अपक्षाची ताकद अधिक असल्याचे अनेक निवडणुकीवरून सिद्ध झाले. या संधीचा फायदा घेत भाजपाने बऱ्यापैकी आपले बस्तान बसवले आहे. त्याचा परिणाम काळी दौ. ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला. ग्रामपंचायतीवर भाजपा प्रणित सत्ता आहे. त्यामुळे भाजपाचे येथे असलेले राजकीय वर्चस्व कोणीही नाकारू शकत नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस रिक्स घ्यायला तयार होत आहे. पुसदमध्ये आठपैकी एकच जागा सर्वसाधारण असल्यामुळे पुसदमधील काही उत्सुक चेहरे काळी दौ. मध्ये तयारी करू पाहता आहेत. त्याचा स्थानिकांना मोठा हादरा बसला आहे. आयात केलेले उमेदवार दिल्यास स्वपक्षातून बंड पुकरले जाऊ शकते, अशी धारणा येथील मतदार बोलून दाखवत आहे. शहरातील मतदारांचा विरोधी कल राष्ट्रवादीला कॅश करूनच पुढचा डाव खेळावा लागणार असल्याचे येथील जाणकार सांगत आहेत. काळी दौ. ग्राम पंचायतवर भाजपाची सत्ता असून, त्या भरवशावरच येथे जिल्हा परिषद काबीज करण्याच्या हालचाली पक्षाकडून सुरू आहेत. उमरखेडचे आमदार आणि पुसदचे भाजपा नेते अॅड़ निलय नाईक यांनी काळी दौ. मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या भागाचा विकास हे एकमेव प्रचाराचे सूत्र राहणार आहे. गेल्या कित्येक वर्षात मतदारसंघात पाहिजे तसा विकास झालेला नाही. वास्तविक हा परिसर महागाव तालुक्यात येत असला तरी पुसद विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. पुसदकरांनी पाहिजे तसा विकास या भागाचा केला नाही ही सल मतदारांच्या मनात घर करून आहे. भाजप केवळ विकासाचा मुदा घेऊनच या मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जाणार आहे. खरी लढत येथे भाजपा सेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहायला मिळणार आहे. तिनही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही दौ. गटातील निवडणूक मतदारांसाठी लक्षवेधी राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)
काळी गटावर लागल्या सर्वांच्या नजरा
By admin | Updated: January 7, 2017 00:40 IST