उमरखेड (कुपटी) : थकीत वेतनासाठी तब्बल २१ दिवसांपासून आंदोलन करणार्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. साखर आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कामगारांना चार महिन्याचा पगार देण्याचा निर्णय झाला. सहकारी तत्वावर सुरू असलेल्या विदर्भातील एकमेव सहकारी साखर कारखाना आंंदोलनातून बंद पडतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र साखर आयुक्त, कारखाना प्रशासन आणि कामगार संघटनेने यशस्वी तोडगा निघाला. पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन झाले नाही. त्यामुळे कामगार संघटना आणि प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाला. हा वाद टोकाला जाऊन कामगारांनी २५ एप्रिलला वसंत कारखान्याच्या कार्यालयापुढे मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले. तब्बल २१ दिवस धरणे सुरू होते. वाटाघाटी करण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु यशस्वी तोडगा निघत नव्हता. वादाची तीव्रता वाढत जात असल्याने अखेर १५ मे रोजी पुणे येथे साखर आयुक्त डॉ.संजय भोसले व प्रादेशिक संचालक अमरावती यांनी कारखान्याचे अध्यक्ष वसंत देवसरकर, संचालक डॉ. राजीव मोतेवार, राजेश देशमुख, किशोर वानखडे, रमेश चौधरी, बळवंतराव नाईक आणि कामगार संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव, नारायण आमले यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत थकीत पगारावर चर्चा झाली. यात वसंत प्रशासनाने आपली बाजू मांडली तर आठ महिन्याच्या पगाराची जोरदार मागणी संघटनेने केली. त्यानंतर साखर आयुक्तांनी मध्यस्थी करीत चार महिन्याचा पगार येत्या दहा दिवसात करण्याचा तोडगा काढला. त्यावर एकमत झाले. या वाटाघाटीमुळे कामगारांना थकीत पगाराचे एक कोटी ५० लाख रुपये मिळणार आहे. (वार्ताहर)
साखर कामगारांच्या आंदोलनाची सांगता
By admin | Updated: May 19, 2014 23:55 IST