आर्णी : येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल, असा आदेश दिला आहे. शहराची ही योजना ४१ कोटी ८१ लाख रुपयांची आहे. आर्णी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. ग्रामपंचायत आणि आता नगरपरिषद झाल्यानंतरही नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आर्णी शहरासाठी अरुणावती प्रकल्पावरून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली. यात नगरपरिषद आर्णीने सदर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्याचे ठरविले. नंतर मात्र एक विशेष सभा घेवून सदर काम खासगी कंत्राटदारांकडून करून घ्यावे, असे ठरविण्यात आले. परंतु नगरसेविका अंजली खंदार यांनी याला विरोध केला. पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांकडून करून न घेता शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करून घ्यावी, अशी भूमिका घेतली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. दोनही बाजू ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर काम जीवन प्राधिकरणाला द्यावे, असा आदेश दिला. त्यामुळे हा प्रश्न एकदाचा निकाली निघाला. आर्णी शहरासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अरुणावती प्रकल्पावरून पाईप लाईन पाण्याच्या टाकीपर्यंत टाकणे, जलशुद्धीकरण प्लांट तयार करणे आदी बाबींचा समावेश या योजनेत आहे. लवकरच ही योजना मार्गी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)
अखेर आर्णी पाणीपुरवठ्याचे काम जीवन प्राधिकरणकडे
By admin | Updated: January 5, 2015 23:11 IST