लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/उमरखेड : उमरखेड तालुक्यातील दराटीनजीक शिवाजीनगर-२ येथे पुरामुळे पाणी शिरले होते. तेथील ७० घरांचे अंशत: नुकसान झाले. शुक्रवारी आजी-माजी आमदारांसह प्रशासनाने घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे शिवाजीनगर-२ तांड्यालगतचा तलाव पूर्णपणे भरला. तलावाच्या आउटलेटमधून निघालेले पाणी नजीकच्या नाल्यात पोहोचले. त्यामुळे नाल्याला पूर येऊन लगतच असलेल्या तांड्यात पाणी शिरले. शिवाजीनगर-२ तांड्यामध्ये जवळपास कंबरभर पाणी साचले होते. प्रत्येकाच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे अन्नधान्य व इतर साहित्याची हानी झाली. गावातील नागरिकांनी एकमेकांच्या साहाय्याने पुरातून कसा तरी मार्ग काढून सुरक्षित स्थळ गाठले. त्यामुळे प्राणहानी टळली. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत सर्व नागरिक जीव मुठीत धरून वावरत होते. दरम्यान, शुक्रवारी आमदार नामदेव ससाने, माजी आमदार राजेंद्र नजरधने, उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, जिल्हा परिषद सदस्य ताई आडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पाहणी केली. यात ७० घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे दिसून आले. पुरात कोणतेही घर वाहून गेले नाही, तसेच जीवितहानी झाली नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
नाला खोलीकरण, रुंदीकरण गरजेचेशिवाजीनगर-२ लगत नाला वाहतो. या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरुवारी पुराचे पाणी तांड्यात शिरले. आमदार नामदेव ससाने यांनी पुरास कारणीभूत ठरलेल्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे आश्वासन दिले, तसेच प्रशासनातर्फे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची ग्वाही दिली. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अद्यापही नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण न झाल्याने संताप व्यक्त केला.