सरासरी ओलांडण्याची चिन्हे : रबीच्या सिंचनाची मिटली चिंतादारव्हा : आतापर्यंत दारव्हा तालुक्यात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. परतीचा पाऊसही सलग पडत असल्याने तालुक्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील लहान-मोठी धरणे तुडूंब भरल्याने याचा फायदा भूजल पाणीपातळीत वाढ होऊन परिणामी सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यालगत असलेल्या अडाण नदीवरील म्हसणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. या प्रकल्पात सध्या ६७.२५ दलघमी पाणीसाठा आहे. वाशीम जिल्ह्यात झालेल्या पावसाने अडाण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या अडाण प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले आहे. या प्रकल्पात ६५.७१ दलघमी एवढा उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अडाण प्रकल्प तालुक्यात नसला तरी संपूर्ण प्रकल्पाचे सिंचनासाठी कालवे हे दारव्हा तालुक्यात आहे. यावर्षी ५० किमीपर्यंत सिंचनासाठी पाणी शेतकऱ्यांसाठी सोडणार असल्याची माहिती अभियंता एन.व्ही. तांबुळे यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुक्यातील पाथ्रडदेवी येथे असलेला गोखी प्रकल्प १०० टक्के भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे. कुंभारकिन्ही लघु प्रकल्पात ९० टक्के पाणीसाठा झाला. हातोला येथील प्रकल्पात ९० टक्के, तर अंतरगाव प्रकल्पात ९८ टक्के साठा झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ७५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. परतीचा पाऊसही दमदार होत असल्याने येत्या आठवड्यात तालुक्यातील सर्वच प्रकल्प पूर्णत: भरण्याची आशा असून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
अडाण व गोखी तुडूंब भरले
By admin | Updated: October 5, 2016 00:41 IST