बनावट ई-वाहतूक पास बनविणारे रॅकेट सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 05:00 AM2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:11+5:30

शासनाच्या नियमानुसार २४  तासात ई-पास उपलब्ध करून दिला जातो. परंतु त्यासाठी वाहनात प्रवास करणाऱ्या चालकासह इतरांची ७२ तासातील आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजन टेस्ट बंधनकारक आहे. याशिवाय प्रवाशाचे आधार कार्ड, जाण्याचे ठिकाण, वाहन क्रमांक, जाण्या-येण्याचा वेळ आदी माहिती मागितली जाते. परंतु यवतमाळ शहरात या ई-वाहतूक पासचाही बनावट कारभार सुरू आहे.

Activating racket making fake e-transport pass | बनावट ई-वाहतूक पास बनविणारे रॅकेट सक्रीय

बनावट ई-वाहतूक पास बनविणारे रॅकेट सक्रीय

Next
ठळक मुद्दे३०० ते ५०० रुपयांत विक्री : ‘लोकमत’ च्या स्टिंग ऑपरेशनमधून झाला यवतमाळातील भंडाफोड

 सुरेंद्र राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन कडक झाल्याने प्रवेशासाठी वाहनांना ई-पास सक्तीचे करण्यात आले आहे. त्याची संधी साधून यवतमाळ शहरात बनावट ई- वाहतूक पास तयार करून त्या ३०० ते ५०० रुपयात विकण्याचा गोरखधंदा सुरू होता. ‘लोकमत’ने बनावट ग्राहक पाठवून पुराव्यानिशी त्याचा भंडाफोड केला आहे. 
सर्वच  जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने शासनाने १५ मेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन जारी केला आहे. हा लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात एन्ट्री नाही. अत्यावश्यक कामासाठीच्या प्रवासासाठीसुद्धा ई-वाहतूक पास सक्तीची करण्यात आली आहे. लग्नकार्य, अंत्यसंस्कार व वैद्यकीय कारणांसाठीच  जिल्ह्याची सीमा ओलांडून प्रवेश करता येणार असून, त्यासाठी पास सक्तीचा आहे. 
बनावट ई-पासचा सूत्रधार प्रतीक 
शासनाच्या नियमानुसार २४  तासात ई-पास उपलब्ध करून दिला जातो. परंतु त्यासाठी वाहनात प्रवास करणाऱ्या चालकासह इतरांची ७२ तासातील आरटीपीसीआर किंवा रॅपिड ॲंटिजन टेस्ट बंधनकारक आहे. याशिवाय प्रवाशाचे आधार कार्ड, जाण्याचे ठिकाण, वाहन क्रमांक, जाण्या-येण्याचा वेळ आदी माहिती मागितली जाते. परंतु यवतमाळ शहरात या ई-वाहतूक पासचाही बनावट कारभार सुरू आहे. अवधूतवाडी पाेलीस ठाणे हद्दीतील प्रतीक नामक युवक या रॅकेटमध्ये सक्रिय असून, तोच सूत्रधार आहे. या बनावट पाससाठी तो ३०० ते ५०० रुपये आकारतो. 
अंत्यसंस्कार, वैद्यकीय कारणांवर जोर 
या ई-पाससाठी बहुतांश अंत्यसंस्कार व वैद्यकीय कारणे सांगितली जातात. लग्नप्रसंगाचे कारण सांगितल्यास पत्रिका जोडावी लागत असल्याने बहुतांश हे कारण टाळले जाते. प्रतीकच्या माध्यमातून किती तरी बनावट ई-पास वाहनांना दिले आहेत. ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा गंभीर प्रकार पुराव्यानिशी उघडकीस आला. ई-पासच्या या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्याचे आव्हान अवधूतवाडी पोलीस व सायबर गुन्हे शाखेपुढे आहे.  
दारू तस्करीतही सूत्रधार सक्रिय
प्रतीक हा बनावट ई-पास सोबतच दारू वाहतूक व पुरवठ्याचा अवैध धंदाही करीत असल्याची चर्चा आहे. त्याच्या घरातून अवैधरीत्या दारूही जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बनावट ई-पास आणि दारूच्या तस्करीत प्रतीक एकटा निश्चितच नसावा. त्यामुळे त्याच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहे हे शोधण्याचे आव्हानही पोलिसांपुढे आहे. 

शासनाच्या पासमध्ये एडीटिंग करून बनते नवी पास  
n शासनाकडून ई-पास ही पीडीएफ स्वरूपात दिली जाते. प्रतीक हीच पास आपल्या लॅपटॉपवर घेऊन व त्यात नावे, वाहन नंबर, तारीख, ठिकाण फेरफार करून हुबेहुब बनावट ई-वाहतूक पासचे पीडीएफ ३०० ते ५०० रुपयात उपलब्ध करून देतो. विशिष्ट पद्धतीने संगणकात शासनाच्या पीडीएफ पासचे एडिटिंग करतो. त्यासाठी त्याने आपण शासनाची ऑनलाइन पास संगणकावरून काढून देतो असा प्रचार केला आहे. सायबर कॅफे बंद असल्याने अनेक लोक ई-वाहतूक पाससाठी प्रतीककडे जातात. तो बनावट पास देत असल्याबाबत कित्येक नागरिक अनभिज्ञ आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीकचा हा पैसे कमविण्याचा फंडा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करून सुरू आहे.

यवतमाळ शहरात बनावट ई-वाहतूक पास दिल्या जात असल्याची कुणकुण आहे. त्या दिशेने वेगवान हालचाली करून यातील सूत्रधारांना ताब्यात घेतले जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. 
- अमोल पुरी
सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम विभाग, यवतमाळ

‘डमी ग्राहक’ पाठवून मिळविला भक्कम पुरावा
- यवतमाळ शहरात बनावट ई-पास मिळत असल्याचे कळताच ‘लाेकमत’ने स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरविले. 
- त्यासाठी ११ मे रोजी प्रतीककडे एक डमी ग्राहक पाठविण्यात आला. त्याला नागपुरात हाॅस्पिटलमध्ये जायचे असल्याचे सांगण्यात आले. 
- ठरलेली रक्कम घेऊन प्रतीकने डमी ई-वाहतूक पास बनवून दिली. ही पास या कारभाराचा भंडाफोड करण्यासाठी पुरावा ठरली आहे. 

 

Web Title: Activating racket making fake e-transport pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.