लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वारंवार अल्टीमेटम देऊनही कामावर हजर होत नसल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी एसटीच्या यवतमाळ विभागातील ६५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. संपकाळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. आतापर्यंत बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील विविध आगारातून २० बसफेऱ्या विविध मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ५५ दिवसांचा कालावधी लोटूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई केली जात आहे. कारणे दाखवा, निलंबन, बडतर्फ यासारखी कारवाई करण्यात येत आहे. कामावर येत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही मार्गांवर बसेस सोडण्यात येत आहेत. शुक्रवारी २० बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. कर्मचारीही आपल्या मागणीवर ठाम आहेत. कामावर रुजू होणारे कर्मचारीही वाढत आहेत; परंतु त्यात चालक-वाहकांचे प्रमाण अतिशय कमी आहे. दरम्यान, ५१ दिवसानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. तर दुसरीकडे प्रवाशांना आता खासगी वाहतूक अंगवळणी पडल्याचे चित्र जिल्हाभरात दिसत आहे.
कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार - यवतमाळ विभागातील एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याविरोधात त्याने येथील कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या निकालानंतर महामंडळाने कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ केले. कारवाईपूर्वी कर्मचाऱ्यांना बजावली होती नोटीस - संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना विविध प्रश्न विचारत कारणमीमांसा नोटीस बजावण्यात आली होती. नियोजित कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे या कारणांसाठी या कर्मचाऱ्यांवर दोषारोपपत्र दाखल करून नोटीस बजावली होती.