खंडणीची मागणी : नाकाबंदी करून पाच आरोपींना अटकपुसद : आपल्या चार मित्रासह कारने जाणाऱ्या पुसद येथील एका इसमाचे चाकूच्या धाकावर आठ जणांनी अपहरण केल्याची घटना घडली. तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याची माहिती असून पोलिसांनी नाकाबंदी करून पाच जणांना अटक केली तर अपहरणकर्त्यांनी सदर इसमाला यवतमाळ विमानतळाजवळ सोडून दिले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुसद येथील ग्रीनपार्क (श्रीरामपूर) येथील संजय माधव अहीरराव (५७) हे आपल्या चार मित्रासह कारने तालुक्यातील जवळा येथे भोजनासाठी ११ आॅक्टोबरला दुपारी गेले होते. जेवण घेऊन परत येत असताना खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जवळा ते देवठाणा रस्त्यावर त्यांची कार एका वाहनातून आलेल्या आठ जणांनी अडविले. चाकूच्या धाकावर अहीरराव यांच्या खिशातील पाच हजार रुपये व दोन मोबाईल हिसकावून घेतले. एवढेच नाही तर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तीन कोटी रुपयांची मागणी केली. अहीरराव यांनी नकार दिला. त्यावेळी आरोपींनी अहीरराव यांना स्वत:च्या वाहनात डांबून अपहरण केले. या नाट्यमय घडामोडीनंतर आरोपी अहीरराव यांना घेऊन वाशिम जिल्ह्यातील अनसिंग मार्गे मंगरुळपीरकडे निघाले. मंगरुळपीर पोलीस ठाण्याअंतर्गत एका रस्त्यावर चारचाकी वाहन नादुरुस्त अवस्थेत उभे होते. या आरोपींनी चाकूच्या धाकावर त्या वाहनाधारकाला लुटले. त्यानंतर आठही जण कारंजामार्गे दारव्हा व तेथून यवतमाळकडे रवाना झाले. फिर्यादी अहीरराव यांना मारहाण करून रात्रीच्या सुमारास यवतमाळ येथील विमानतळाजवळ सोडल्याची माहिती आहे. दरम्यान मंगरुळपीर पोलीस ठाण्यांतर्गत लुटल्या गेलेल्या वाहनधारकाने मंगरुळपीर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सर्वत्र सूचना देऊन नाकाबंदी केली. त्यावेळी दारव्हा पोलिसांनी रात्री ११.३० वाजता आरोपी शेख मुख्तार शेख निजाम (२७) रा. खंडाळा, गोलू जगदीश उंटवाल रा. नवलबाबा वार्ड पुसद, ईश्वर तुकाराम राठोड रा. सेवादासनगर, मो.समीर मो. कलीम (२६) रा. बालाजी वार्ड पुसद या चार जणांना पकडून मंगरुळपीर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे. दरम्यान १२ आॅक्टोबर रोजी वसंतनगर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणेदार सदानंद मानकर, डीबीचे राजू खांदवे, रोशन नाईक, कुणाल मंडोकार, भास्कर गंधे यांनी सापळा रचून इरफान ऊर्फ तप्पू खान हारुन पठाण (२७) रा. वसंतनगर पुसद याला इंडिका कार एम.एच.२९-एडी-१९७५ सह जेरबंद करण्यात आले. आरोपी इरफानला खंडाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर तीन जण पसार झाले आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहे. खंडाळा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पुसदच्या इसमाचे अपहरण करून सोडले
By admin | Updated: October 14, 2015 02:56 IST