वणी (यवतमाळ): वणी-यवतमाळ मार्गावरील निंबाळा (रोड) या गावालगतच्या नाल्याजवळ वाघाने रोह्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे याच परिसरातून बैल घेऊन जाणाऱ्या एका गुराख्याला हल्लेखोर वाघाने दर्शन दिले. घटनास्थळी वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले असून, वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. ही घटना निंबाळा गावापासून केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर घडली.
सोमवारी सकाळी निंबाळा गावातील रहिवासी सुधाकर आत्राम हे गावालगत असलेल्या नाल्याजवळून बैल घेऊन जात असताना त्यांना त्या ठिकाणी एक रोही मृतावस्थेत दिसून आला. त्यानंतर ते पुढे निघून गेले. मात्र त्यांच्यापासून थोड्या दूर अंतरावर त्यांना पट्टेदार वाघ दिसून आला. त्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला. ही बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. घटनेची माहिती मिळताच, सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे व गावकरी घटनास्थळी पोहोचले. घटनेची शहानिशा केल्यानंतर मनोज ढेंगळे यांनी वणीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सुजाता विरकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विरकर यांनी तत्काळ वनरक्षक व वनपालांना घटनास्थळी रवाना केले.
वाघाच्या हालचालीवर लक्ष
रोह्याची शिकार वाघानेच केल्याचे लक्षात येताच, वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी वाघाने शिकार केली, त्या ठिकाणी पाच ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. या घटनेने निंबाळा व परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे. गावालगत वाघ शिरल्याने सोमवारी अनेकजण शेतातच गेले नाहीत.
वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
काही महिन्यांपूर्वी निंबाळा गावालगत एका वाघाने तब्बल तीन दिवस बस्तान मांडले होते. हा वाघ आजारी होता. त्यामुळे त्याला व्यवस्थित चालताही येत नव्हते. चौथ्या दिवशी मात्र तो त्या ठिकाणावरून निघून गेला. त्या वाघाचे पुढे काय झाले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. आता पुन्हा एकदा गावालगत वाघ फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा निंबाळा येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे व गावकऱ्यांनी दिला आहे.
"निंबाळा गावाजवळ सोमवारी वाघ शिरला. त्याने एका रोह्याची शिकारही केली. घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. परिसरातील गावकऱ्यांनी समूहाने शेतात जावे. दक्षता घ्यावी. वनविभाग वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. "- सुजाता विरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वणी.