लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. दोन हजार शेतकरी, शेतमजूर बाधित झाले. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. या कंपन्या राज्यातील २८ हजार गावात प्रबोधन करणार आहे. राज्यातील ९० कंपन्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सन २०१७-२०१८ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेने २२ मृत्यू झाले. बाधित दोन हजार शेतकरी आणि शेतमजूरातील ८३९ शेतकरी-शेतमजूर यवतमाळ जिल्ह्यातील होते. आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे अनेकांचे प्राण वाचले. यानंतर कृषी विभागाने अनेक औषधांवर बंदी घातली. विषबाधा व मृत्यू रोखण्यासाठी गेल्या वर्षी कृषी खात्याने व्यापक उपाययोजना केल्या होत्या. कीटकनाशक कंपन्यांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना कीट देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही सन २०१८-२०१९ मध्ये ३३५ शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले. राज्यात सहा शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यापासून धडा घेत आता विषबाधा होऊच नये यासाठी कृषी आयुक्तालयाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरू केल्या. आता थेट कीटकनाशक कंपन्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीला गावपातळीवर काम करावे लागणार आहे. त्याकरिता एक साजा निश्चित केला जाणार आहे.फवारणी करताना कुठली खबरदारी घ्यावी, कुठल्या उपाययोजना कराव्या, संरक्षण किटचा कसा वापर करावा, अतिजहाल औषधी कशी ओळखावी याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षा किटही वितरित कराव्या लागणार आहे. कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, गावसभा, मासिक चर्चासत्र, कार्यशाळा, पथनाट्य या माध्यमातून जाणीव जागृती करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहे.बोंडअळीने नुकसान टाळण्यासाठी रथफेरीगुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बियाणे कंपनीला गावापर्यंत रथफेरी न्यावी लागणार आहेत. यात ट्रायकोकार्ड, फेरोमन ट्रॅप, प्रकाश सापळे याविषयीची माहिती दिली जाणार आहे. या वस्तू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बियाणे कंपनीवर आहे. यासंपूर्ण प्रक्रियेत काय बदल घडतात यावर पुढील उपाययोजना विसंबून राहणार आहे.
विषबाधा रोखण्याची जबाबदारी ९० कीटकनाशक कंपन्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:44 IST
अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे.
विषबाधा रोखण्याची जबाबदारी ९० कीटकनाशक कंपन्यांवर
ठळक मुद्देकृषी आयुक्तांचे आदेश २८ हजार गावात प्रबोधन करण्याच्या सूचना