पुसद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही. पुसद तालुक्यातील वरूड येथील रोपवाटिकेच्या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याने ६० ते ७० हजार रुपये निकामी होऊन ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत सदस्यांसह दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रकरणी ग्रामस्थांची भूमिका पाहता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील वरूड येथे रोपवाटीकेचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेंतर्गत वरूड ग्रामपंचायतीला एक लाख रोपे तयार करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. दरम्यान एक ते नऊ महिन्यांपर्यंत ६० ते ७० हजार उत्कृष्ट दर्जाची रोपे शासनाकडून पुरविण्यात आली. परंतु सदर रोपांचे प्राकलन करण्यात आले नाही. त्यामुळे ती ६० ते ७० हजार रोपे वाया गेली. यामध्ये ग्रामपंचयतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार ग्रामपंचायतचे सदस्य विश्वंभर सूर्य, देवराव डांगे व इतर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच केले आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणाची चौकशी कृषी अधिकाऱ्यांमार्फत १७ मे रोजी करण्यात आली होती. त्यानुसार रोपवाटिकेच्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत सचिव व संबंधितांवर कारवाई करण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना १८ जुलै २०१४ रोजी एका आदेशाने दिले आहेत. मात्र रोपवाटिकेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने याप्रकरणी गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यानुसार वरुड ग्रामपंचायतचे सचिव व संबंधितांसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पुसद पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वंभर सूर्य यांनी केली आहे. तसेच याप्रकरणातील दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष्य रागले आहे. (प्रतिनिधी)
वरुडच्या रोपवाटिकेतील ७० हजारांची वृक्षे वाळली
By admin | Updated: October 28, 2014 23:26 IST