लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील अपहाराचा तपास एसआयटीकडून करण्यात आला आहे. अपहाराची व्याप्ती ४९ कोटी असून नऊ आरोपींविरुद्ध तब्बल पाच हजार ७७३ पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले आहे.
जनसंघर्ष अर्बन निधीच्या दिग्रस येथील मुख्य शाखेसह पुसद, आर्णी, दारव्हा, नेर, कारंजा आणि मानोरा या उपशाखेत सहा हजार २०० खातेदारांनी ४४ कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. अंदाजे तीन ते चार महिन्यांपूर्वी संचालक मंडळाने गाशा गुंडाळून पळ काढला. याची माहिती होताच ठेवीदार चिंतेत सापडले आणि त्यांनी संचालक मंडळाविरोधात दिग्रस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या आरोपींवर गुन्हे दाखल केले. अपहारातील पैसे परत मिळावे यासाठी निधी सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाकडून पांढरकवडा एसडीपीओ रामेश्वर वैजने यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली. एमपीआयडी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडूनही तपास करण्यात आला. सर्व आरोपींना अटक केली. मास्टरमाईंड प्रणीत मोरे असल्याचे समोर आले. आरोपींच्या घर झडतीत काही दस्तावेज पोलिसांच्या हाती लागली.
अपहार रकमेतून मालमत्ता, वाहने खरेदी, आर्थिक व्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाले. संचालकांसोबतच इतर दोन आरोपी पोलिसांनी निष्पन्न केले. शिवाय फॉरेन्सिक ऑडिटर, सक्षम प्राधिकारी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण केली. चौकशीअंती अपहार ४९ कोटींचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर शुक्रवारी सर्व आरोपींविरुद्ध दारव्हा न्यायालयात प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले. त्यामुळे खातेदारांना दिलासा मिळाला असून खातेदारांना परतावा देण्याच्या कार्यवाहीला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
असे आहेत आरोपीप्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, जयश्री देवानंद मोरे, प्रीतम देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल, आलमगीर खान जहागीर खान, नूर मोहम्मद खान गुलाब खान या आरोपींविरुद्ध दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी रेकॉर्डवर घेतलेल्या मालमत्ताजनसंघर्ष प्रकरणात आतापर्यंत २ दोन कोटी ९८ लाख ८८ हजार १७० रुपये रोख पोलिसांनी हस्तगत केले आहे. शिवाय सहा दुचाकी आणि चार चारचाकी वाहने ताब्यात घेतली आहे. एकूण १८ स्थावर मालमत्ता आहेत.
"जनसंघर्ष अर्बन निधी प्रकरणात पाच हजार ७७३ पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र दारव्हा न्यायालयात दाखल केले आहे. मालमत्ता जप्त आणि लिलाव कार्यवाही संबंधी शासनाकडे परवानगी मागितली जाईल."- रामेश्वर वैजने, एसडीपीओ, पांढरकवडा