नगराध्यक्षांचे प्रयत्न : दहा वर्षांपासून रखडलेले काम पूर्णत्वास जाणारपुसद : येथील संभाजीनगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे दहा वर्षांपासून रखडलेले काम आता पूर्णत्वास जाणार आहे. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्याची माहिती नगरपरिषदेच्यावतीने देण्यात आली. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने समस्या वॉर्डावॉर्डाच्या या सदरातून या सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मांडला होता. पुसद नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.११ मध्ये संभाजीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची अधर्वट इमारत उभी आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी दिवंगत रा.सु. गवई आणि दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या निधीतून बांधकाम करण्यात आले. परंतु निधीच्या कमतरतेमुळे दहा वर्षांपासून केवळ इमारतीचा ढाचा उभा आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली. तर नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण महोत्सवी योजनेतून अपूर्ण भवनाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधीची मागणी केली. सांस्कृतिक व सामाजिक मंत्री राजकुमार बडोले यांनी नगरविकास सचिवांना अनुसूचित जाती व नवबौद्ध जातीचा विकास करणे या कार्यक्रमांतर्गत मंजुरी प्रदान करावी, असे आदेश दिले. त्यानुसार ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सध्या या भवनाची इमारत उभी असून प्लास्टर, दारे, खिडक्या, टाईल्स लावली जाणार आहे. लवकरच या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले. गत दहा वर्षांपासून या सांस्कृतिक भवनाचे काम रखडले आहे. परिसरातील नागरिकांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर आता निधी आल्याने लवकरच सांस्कृतिक भवन लोकांच्या सेवेत रुजू होणार आहेत. (लोकमत चमू)तीन कोटींचे विशेष अनुदानमहाराष्ट्र शासनाच्यावतीने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान दिले जाते. पुसद नगरपरिषदेला तीन कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सदर निधी प्राप्त झाल्यानंतर शहरातील बगिच्यांमध्ये महिलांसाठी खास मॉर्निंग वॉक ट्रॅक, पूस नदी बांध ते नरहरी महाराज मंदिरापर्यंत रस्त्यांचे बांधकाम आणि नवीन प्रभाग क्र.९ मधून नाल्याचे सरळीकरण व पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या सूत्रांनी सांगितले. नगराध्यक्ष अनिताताई नाईक शहरातील प्रलंबित कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे माजी उपाध्यक्ष शेख कय्यूम यांनी कळविले.
सांस्कृतिक भवनासाठी ५० लाख
By admin | Updated: March 27, 2017 01:20 IST