पीकविमा मदतीचा लाभ बँकांना : चार लाख शेतकऱ्यांचा भ्रमनिरासयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे कवच मिळाले. ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला, ते मदतीस पात्र ठरले. त्याचे पैसे जिल्ह्याकडे वळते झाले. मात्र, हा पैसा जिल्ह्याकडे वळता होताच जिल्हा बँकेने कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम कापून घेतली. जिल्ह्यातील एक लाख थकबाकीदारांना याचा पहिला फटका बसला. दुसऱ्या टप्प्यात तीन लाख शेतकऱ्यांचा राष्ट्रीय कृषी पीक विमा मंजूर होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीक विम्याची रक्कम कर्जात कापल्याने दुसऱ्या टप्प्यातील विम्याची रक्कम मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यापैकी बहुतांश शेतकरी थकबाकीदार आहे. याच संधीचा फायदा घेत बँकेने शेतकऱ्यांना मिळालेली विम्याची मदत कर्जात कापण्याचा निर्णय घेतला. हवामानावर आधारीत पीक विमा मंजूर होताच बँकेने कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम कापून घेतली. यामुळे दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे.मंजूर पीक विमा२०१५-१६ च्या खरीप हंगामात एक लाख एक हजार १९५ शेतकऱ्यांनी एक लाख दोन हजार ७१३ हेक्टरवरील पिकासाठी ११ कोटी ३६ लाखांचा विमा उतरविला होेता. यामधील ९८ हजार ५४७ शेतकऱ्यांना १ लाख १ हजार ५८३ हेक्टरसाठी ४५ कोटी ७३ लाख ८० हजार रूपयांचा विमा मंजूर करण्यात आला. यामध्ये कापूस, सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाचा समावेश आहे. या पिकाकरिता तीन हजारांपासून आठ हजार १७१ रूपयांपर्यंत हेक्टरी मदत मिळणार आहे. (शहर वार्ताहर)बँक म्हणते, शेतकऱ्यांचे प्रिमियम बँकेने भरले होतेहवामानावर आधारीत पीक विमा योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा बँकेने उतरविला होता. विम्याकरिता लागणारी रक्कम बँकेने भरली होती. यामुळे या विमा योजनेस पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम कर्जात कपात करण्यात आली. यातून शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी होणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.दुसऱ्या टप्प्यातील पीक विमादुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय कृषी पीकविमा मंजूर होणार आहे. या विम्यात ३ लाख ७ हजार ८८१ शेतकऱ्यांनी २ लाख ४१ हजार ७५७ हेक्टरसाठी १४ कोटी ४७ लाख २७ हजार रूपयांचा विमा उतरविण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पहिल्या टप्प्यात मंजूर झालेला ४३ कोटींचा पीकविमा कर्जात वळता केला. यामुळे दुसऱ्या टप्प्यात हा विमा कर्जदार सभासद असल्यास पीक विम्याची रक्कम कर्जात कापल्या जाण्याचा धोका वाढला आहे.अशी मिळणार मदतआर्णी तालुक्याला २ कोटी ७० लाख ३७ हजार २९३ रूपयांची मदत मिळणार आहे. बाभूळगाव २ कोटी ५५ लाख २७ हजार ३८२ रूपये, दारव्हा २ कोटी २२ लाख ३६ हजार १४६ रूपये, दिग्रस १ कोटी ४८ लाख ५६ हजार २७६ रूपये, घाटंजी ३ कोटी १० लाख ४४ हजार १४४ रूपये, कळंब १ कोटी ९० लाख २ हजार ४८९ रूपये, पांढरकवडा २ कोटी ३८ लाख ४४ हजार ८९ रूपये, महागाव १ कोटी ८१ लाख ८९ हजार ३४४ रूपये, मारेगाव ३ कोटी १९ लाख ५२ हजार १६२ रूपये, नेर १ कोटी २७ लाख १८ हजार २६९ रूपये, पुसद ३ कोटी ६७ लाख ६१ हजार ८७८ रूपये, राळेगाव ४ कोटी ४१ लाख ६६ हजार १७८ रूपये, उमरखेड २ कोटी ९२ लाख ९९ हजार २८९ रूपये, वणी ७ कोटी १९ लाख ७४ हजार ३१ रूपये, यवतमाळ १ कोटी ७० लाख ३५ हजार ४२३ रूपये, झरीजामणी २ कोटी १७ लाख ३५ हजार ९४२ रूपये.
शेतकऱ्यांचे ४३ कोटी बँकांनी कर्जात कापले
By admin | Updated: March 7, 2016 02:11 IST