परतीचा पाऊस : शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधीत झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे.सप्टेंबर अखेर आणि आॅक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला प्रचंड फटका बसला. शेंगांमधील सोयाबिनला जागीच कोंब फुटले. काही शेंगा गळून पडल्या. शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. यामुळे ऐन सणांच्या दिवसांत बळीराजाच्या चेहऱ्यावरील हसू हिरावले. तब्बल ४२ हजार हेक्टवरील सोयाबीन पावसाने बाधीत झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. परतीच्या पावसाने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. त्यांना मोठा फटका बसला. यातून सावरण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीने सरसकट मदत द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने पारित केला आहे. तथापि अद्याप शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतेही धोरण जाहीर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. तथापी अद्याप शासनाने किंवा विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. (शहर प्रतिनिधी)सोयाबीन बाजारात येताच दरही गडगडलेसोयाबीन बाजार येताच व्यापाऱ्यांनी दरही पाडले आहे. गेल्या वर्षी जवळपास तीन हजार ५०० ते चार हजार रुपये प्रति क्ंिवटल दर मिळाला होता. यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच किमान १८०० ते २४०० रुपये प्रमाणे प्रति क्ंिवटल दर मिळत आहे. शासनाने सोयाबीनचा हमी दर प्रति क्ंिवटल दोन हजार ७७५ रुपये ठरविला आहे. मात्र हमी दरापेक्षाही कमी किंमत मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. दसरा आणि दिवाळी सणात सोयाबीन विकूनच शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येते. मात्र यावर्षी दर गडगडल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दिवाळी जेमतेम १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. अद्याप शेतात कापूसही फुटलेला नाही. सोयाबीनला भावही मिळत नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
४२ हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित
By admin | Updated: October 16, 2016 00:55 IST