पांढरकवडा नगरपरिषद : अखेरची शिल्लक साडेसात कोटी राहण्याचा अंदाजपांढरकवडा : येथील नगरपरिषदेने शुक्रवारी सन २०१६-१७ करिता ४० कोटी ३३ लक्ष २० हजार ९९० रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. हा अर्थसंकल्प शिलकीचा असून खर्च वजा जाता नगरपरिषदेकडे वर्षाअखेर ७ कोटी ३४ लक्ष रूपयांची शिल्लक राहणार आहे. शुक्रवारी येथील नगरपरिषदेची अंदाजपत्रकीय सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष वंदना रॉय अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी अशोक गऱ्हाटे, लेखापाल रवींद्र मंचलवार यांनी या सभेत सन २०१५-१६ चा सुधारित व सन २०१६-१७ करिता संभाव्य अर्थसंकल्प सादर केला. त्यात प्रारंभीची शिल्लक ७ कोटी ३१ लक्ष दर्शविण्यात आली. सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकामध्ये ४० कोटी ३३ लक्ष रूपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. ७ कोटी ३४ लक्ष रूपये शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रक सादर करताना नगरपरिषदेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा आर्थिकदृष्ट्या त्रुटीत येऊ नये, यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत नगरपरिषद हद्दवाढ परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम तसेच पाईपलाईन उपलब्ध करून देण्याबाबत कामे प्रस्तावित आहे. शहरात अस्तित्वात असलेल्या विद्युत खांबांवर एलईडी पथदिवे बसवून विद्युत खर्च कमी करणे, प्रभागातील खुल्या जागा विकसित करणे, बगिचा निर्माण करणे, महिला व बाल कल्याणच्या विकासाकरिता पाच लक्ष रूपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घरगुती, वैयक्तीक शौचालय बांधकामाकरिता नगरपरिषदेचा हिस्सा अंतर्भूत असून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी सदर अंदाजपत्रकामध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहरातील महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा निर्माण करण्यात येणार आहे. शहर स्वच्छता, घनकचरा, व्यवस्थापन व गटारे, रस्ते, सार्वजनिक शौचालये, मुत्रीघर, साफसफाई, दिवाबत्ती आदी सेवा नगरपरिषदेतर्फे पुरविल्या जातात. मात्र त्यातून नगरपरिषदेला उत्पन्न प्राप्त होत नसून त्यावर खर्च अधिक आहे. यावर उपाययोजना म्हणून नागरिकांचा सहभाग मिळावा व कचऱ्याचे निर्माण कमी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पुढील वर्षात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ५० लाख, साधन सामग्रीकरिता पाच लाख एवढी तरतूद प्रस्तावित आहे. सभेत उपाध्यक्ष सुनंदा देशमुख, नियोजन व विकास सभापती साजीद शरिफ युसुफ शरिफ, बांधकाम सभापती विशाल सिडाम, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती मंजुषा तिरपुडे, महिला व बालकल्याण सभापती पूजा भोयर, उपसभापती संगिता कर्णेवार, नगरसेवक शंकर बडे, म.मन्सूर अ.हक, अनिल बोरेले, मनोज मेश्राम आदींसह नगरपरिषद विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी अंदाजपत्रकावर सविस्तरपणे चर्चा होऊन सर्वानुमते अर्थसंकल्पास मान्यता प्रदान करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
४० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By admin | Updated: February 28, 2016 02:39 IST