रूपेश उत्तरवार यवतमाळ खरीप हंगामात अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. निधी जिल्ह्याकडे वळता केला. मात्र मदतीस पात्र ८२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागला नाही. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेले ३७ कोटी रुपये परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कापूस आणि सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्ह्यातील चार लाख ४६ हजार ९७३ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे दोन टप्प्यात बँक खात्यात जमा करण्यात आले. मात्र जिल्हा प्रशासनाकडे निधी आल्यानंतर ८२ हजार ७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा थांगपत्ताच लागत नव्हता. या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या खात्यात जमा करावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला. शेतकऱ्यांची बँक खाती शोधण्याचे काम तलाठ्यांवर सोपविण्यात आले. मात्र त्यांनाही या खात्याचा शोध लागला नाही. त्यामुळे जिल्ह्यात तीन लाख ६४ हजार ९०२ शेतकऱ्यांच्या खात्यात २०८ कोटी २० लाख ४५ हजार ६२३ रुपये वळते केले. तर ३७ कोटी ४४ लाख ४५ हजार ६२३ रुपये संबंधित तहसीलदारांच्या खात्यात आहे. विशेष म्हणजे ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बँक खात्यात निधी वळता झाला नाही तर हा निधी शासनाच्या तिजोरीत परत जाणार आहे.
दुष्काळी मदतीचे ३७ कोटी परतीच्या मार्गावर
By admin | Updated: March 16, 2015 01:51 IST