लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आकस्मिक काही विभागांना भेट दिली. या भेटीत तब्बल ३० कर्मचारी वेळेपूर्वीच कार्यालयातून गायब झाल्याचे दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, अधीक्षक सुरेश चव्हाण, स्वीय सहायक शरद साळवे आदींनी शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या काही विभागांना आकस्मिक भेट दिली. सीईओंनी प्रथमच अशा प्रकारची भेट दिली. या भेटीत बांधकाम विभाग क्र. १ मध्ये तब्बल २६ कर्मचारी गायब आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला भेट दिली असता, तेथेही दोन कर्मचारी गैरहजर दिसून आले. याशिवाय कृषी विभागाच्या भेटीतही दोन कर्मचारी कार्यालये बंद होण्यापूर्वीच गायब झाल्याचे आढळले. पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून सीईओंकडे कारभार आला आहे. यापूर्वी काही प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहात होता. मात्र, आता पदाधिकारी नसल्याने अनेक कर्मचारी सुस्तावले आहेत. हीच बाब हेरून सीईओ डाॅ. पांचाळ यांनी शुक्रवारी विविध विभागांना आकस्मिक भेट देण्याचा निर्णय घेतला. या भेटीतून वास्तव समोर आले. वास्तविक शासकीय कार्यालय ६.१५ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. आठवडा पाच दिवसांचा झाल्याने ही वेळ वाढली आहे. तथापि, अनेक कर्मचारी ६.१५ पर्यंत थांबतच नसल्याचे दिसून आले.
अशा भेटींची वारंवार गरज- सीईओंनी प्रथमच शुक्रवारी विविध विभागांना आकस्मिक भेट दिली. पदाधिकारी नसल्याने अशा भेटींची वारंवार गरज आहे. ही बाब काही दिवसांपूर्वी सीईओंच्या लक्षात आणून देण्यात आली होती. कदाचित त्यामुळेच त्यांनी शुक्रवारी आकस्मिक पाहणी केली. या पाहणीत गैरहजर आढळलेल्या ३० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.