ब्लिचिंगमध्येही घोळ : आरोग्य विभागाने केले मान्ययवतमाळ : जिल्ह्यातील ५६५ पाण्याचे नमुने दूषित आढळले असून ही टक्केवारी २१ टक्के आहे. आरोग्य विभागाने ही कबुली दिल्याने पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्यातील पाण्याचे नमुने संकलित केले जातात. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यावरून ते पाणी दूषित आहे की पिण्यास योग्य आहे, हे ठरविले जाते. दूषित पाणी आरोग्यास घातक असते. आरोग्य विभागाने आॅगस्ट महिन्यात अणुजीव तपासणीकरिता जिल्हाभरातून दोन हजार ५७८ पाणी नमुने गोळा केले होते. प्रयोगशाळेत तपासणीअंती त्यापैकी तब्बल ५६५ नमुने दूषित असल्याचे आढळूनआले. त्यामुळे संबंधित गावांतील ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. याच महिन्यात ब्लिचिंग पावडरचेही ४३० नमुने घेण्यात आले. सर्व ग्रामपंचायतींना पाण्यात टाकण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ब्लिचिंगचा पुरवठा केला जातो. मात्र अनेक गावांत पाण्यात ब्लिचिंगच टाकले जात नसल्याच्या तक्रारी होतात. हे ब्लिचिंग नेमके कुठे जाते, असा प्रश्न निर्माण होतो. आता पुरविलेल्या या ब्लिचिंगपैकीही तब्बल १० टक्के नमुन्यात क्लोरीन कमी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाले. (शहर प्रतिनिधी)क्लोरीनची मात्रा कमी असूनही गप्प दरमहा घेण्यात येणाऱ्या पाणी नमुने आणि ब्लिचिंग नमुन्यात नेहमी गोंधळ उघड होतो. आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य समितीच्या बैठकीत माहिती सादर केली जाते. मात्र त्यावर कारवाईच्या नावाने मूग गिळण्यात येते. ब्लिचिंगमध्ये क्लोरीनचे प्रमाण कमी आढळूनही संबंधितांना साधा जाब विचारला जात नाही. कारवाई तर अत्यंत दूरची बाब झाली. हीच गत हिवताप नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातही दिसून येते. केवळ आढावा सादर करून त्याला मंजुरी घेतली जाते.
जिल्ह्यातील पाण्याचे २१ टक्के नमुने दूषित
By admin | Updated: October 29, 2016 00:19 IST