बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षाचा कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By सुरेंद्र राऊत | Published: May 24, 2023 06:12 PM2023-05-24T18:12:09+5:302023-05-24T18:13:55+5:30
पहूर येथील घटना
यवतमाळ : लहान मुलांना खावू देण्याच्या बहाण्याने बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर झाला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस.डब्ल्यू.चव्हाण यांनी नराधमाला २० वर्ष समश्र कारावासाची शिक्षा ठोठावली.
सतीश उर्फ गोलू ओंकरराव मारवाडी (३१) रा. पहूर ता. बाभूळगाव असे आरोपीचे नाव आहे. त्याने २०२० मध्ये आठ वर्षाच्या व दहा वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले.
या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी कलम ३७७ व कलम ४, ६, ८, १२ पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. विशेष न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडित बालक, घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली.
विशेष सरकारी वकील ॲड. संदीप अ. दर्डा यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. आरोपीला न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार २० वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा, पॉक्सोचे कलम आठ अंतर्गत तीन वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. दंडाच्या रकमेतून अर्धी रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडित बालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने केला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार प्रकाश रत्ने यांनी सहकार्य केले.