जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : प्रवास भाडे आता मीटरनुसारच आकारणारयवतमाळ : यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे. विनामीटर आॅटोवर कारवाईचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यवतमाळ शहरात सुमारे एक हजार २०० तर जिल्हाभरात १६ हजार आॅटोरिक्षा आहेत. या आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक आहे. मात्र ते लावले जात नाही. प्रवाशांनाही मीटरनुसार भाडे देणे परवडत नाही. त्यात जवळच्या प्रवाशांना सोय तर दूरच्या प्रवाशांना गैरसोय होते. म्हणून आॅटोला मीटरच लावले जात नाही. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक करण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मीटरची ही सक्ती सुरुवातीला यवतमाळ शहरात व नंतर लगेच जिल्हाभरात केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाने (डेप्युटी आरटीओ) विनामीटर आॅटोरिक्षांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. आतापर्यंत शंभरावर आॅटोंना चालान केले गेले. अनेक आॅटोरिक्षांना मीटर आहेत. परंतु ते बंद अवस्थेत आहेत. आरटीओची सक्ती पाहता आॅटोरिक्षा चालकांना तीन हजार रुपयांचे मीटर खरेदी करावे लागणार आहे. ही बाब आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसली तरी आॅटोचालकांनी त्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू केली आहे. मीटर लावल्यानंतर पहिला टप्पा १२ रुपये ५० पैसे तर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर १० रुपये असा दर आकारला जाणार आहे. आॅटोला मीटर लावले तरी त्यासाठी बॅटरी लावावी लागते. अनेकांचे आॅटो घराबाहेर राहत असल्याने ही बॅटरी चोरी जाण्याची भीती असते. दररोज बॅटरी काढून घरात ठेवल्यास मीटरचे सेटिंग बिघडण्याची भीती असते. त्यामुळे मीटर व त्याच्या बॅटरीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीओने मोहीम सुरू करताच आॅटोरिक्षा चालकांनी संपूर्ण कागदपत्रे सोबत ठेवणे सुरू केले आहे. मीटरनुसार प्रवास भाडे देणे ग्राहकांना परवडणारे नाही. म्हणूनच आॅटो चालक मीटर लावणे टाळतात. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनीच सक्ती केल्याने व आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने आॅटो चालकांनी नाईलाजाने का होईना मीटर लावण्याची मानसिकता बनविली आहे. मीटरच्या सक्तीवर आॅटोरिक्षा चालकांच्या संघटना मात्र अद्याप मूग गिळून आहेत. यवतमाळ शहरच नव्हे तर वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र आॅटोरिक्षांना मीटर लावण्याची कारवाई केली जाणार आहे. आॅटोरिक्षा चालकांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या वाहनाला मीटर बसवावे, त्यानुसारच प्रवाशांना भाडे आकारावे असे आवाहन करताना येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी देशमुख यांनी नियमाचे पालन न केल्यास आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
१६ हजार आॅटोरिक्षांना मीटरसक्ती
By admin | Updated: October 9, 2015 00:17 IST