४३३ ग्रामविविध कार्यकारी संस्था राजेश निस्ताने - यवतमाळ शेतकऱ्यांना कर्ज वितरण करून वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामविविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे तब्बल एक हजार ५११ संचालकच स्वत: थकबाकीदार असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या संचालकांना सहायक निबंधकांनी कारणेदाखवा नोटीस बजावली असून आगामी निवडणुकीसाठी त्यांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ५९४ ग्रामविविध सहकारी कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. प्रत्येक तालुक्यात या सोसायट्यांची संख्या २० ते ५० अशी आहे. या सेवा सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना पीक व मुदती कर्जाचे वितरण केले जाते. शेतकऱ्यांच्या कर्जाचा संपूर्ण हिशेबच सेवा सोसायट्यांकडे असतो. तर सेवा सोसायट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. ग्रामीण भागात सेवा सोसायट्यांना वेगळे महत्व आहे. त्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. सहकारातील अनेक दिग्गज नेते या सेवा सोसायट्यांमधूनच घडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ५९४ सेवा सोसायट्या असून त्यातील ९२ या आदिवासी सहकारी सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्यांवर प्रत्येकी १३ संचालक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडले जातात. यावर्षी डिसेंबर दरम्यान ५९४ पैकी अर्ध्या अधिक सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी सहकार क्षेत्रातील स्थानिक नेत्यांनी तयारीही चालविली आहे. सहकार प्रशासनही मतदार याद्या अपडेट करण्यासह निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ही तयारी करीत असताना या सेवा सोसायट्यांचे संचालकच स्वत: थकबाकीदार असल्याची बाब उघड झाली. या संचालकांकडेच कर्जाच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा थकीत आहेत. एरव्ही हे संचालक शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावतात. मात्र सध्या ते स्वत:च सेवा सोसायट्यांचे थकबाकीदार आहेत. या थकबाकीमुळे त्यांचे सेवा सोसायटीच्या मतदार यादीत नाव नोंदविले जाणार नाही. पर्यायाने ते पुढील निवडणुकांसाठी अपात्र ठरतील. यवतमाळ जिल्ह्यात ५९४ पैकी तब्बल ४३३ सोसायट्यांचे एकूण १ हजार ५११ संचालक थकबाकीदार असल्याची नोंद १६ ही तालुक्याच्या सहायक निबंधकांच्या दप्तरी झाली आहे. या सहायक निबंधकांनी सदर थकबाकीदार संचालकांवर अपात्रतेची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी या संचालकांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदार संचालकांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांना नोटीसला उत्तर देण्यासोबतच थकबाकी भरण्याची एक संधी दिली जाणार आहे. ही संधी हुकविल्यास या संचालकांना अपात्र घोषित केले जाईल. त्यांना भविष्यात सोसायटीची निवडणूक लढता येणार नाही.
१५११ संचालक अपात्रतेच्या वाटेवर
By admin | Updated: November 12, 2014 22:50 IST