यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येकी एक लक्ष रूपयांची मदत दिली जाते. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आयुष्य गमवावे लागलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासोबत त्यांना धिर देण्यासाठी यावर्षी आतापर्यंत मदतीस पात्र ठरलेल्या ११९ कुटुंबीयांना १ कोटी १९ लक्ष रूपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. यवतमाळ हा मोठ्या प्रमाणावर कापूस पिकविणारा जिल्हा आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे कापुस हेच मुख्य पिक आहे. मध्यंतरीच्या काळात कापूस उत्पादनात आलेली घट, त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यातच कजार्चा वाढणारा भार यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली. नाइलाजाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर न सोडता शासनाने प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती.रोख रक्कमेसह शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र पॅकेजही दिले होते. केंद्र शासनानेही पॅकेजच्या माध्यमातून मदतीचा हात दिला होता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्यावतीने प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत देण्यात येते. त्यापैकी २९ हजार ५०० रुपये तातडीने धनादेशाच्या स्वरुपात दिले जातात. हा धनादेश वटवून रक्कम लगेच कुटुंबीयांच्या कामी पडते. कुटुंबातील सदस्यांची भविष्यकाळातील ठेव म्हणून ७० हजार ५०० रुपये त्यांच्या पोष्टातील खात्यात संयुक्त स्वरुपात जमा करण्यात येते. पूर्वी ही रक्कम जिल्हाधिकारी व कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्त पोष्ट खात्यात जमा करण्यात येत होती. आता ही रक्कम कुटुंबातील व्यक्तीच्या पोष्ट खात्यात जमा होते. भविष्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने योग्य वापरासाठी रक्कम काढण्याची अनुमती देण्यात येते. शासनाने यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ११९ शेतकऱ्यांना १ कोटी १९ लक्ष रूपयांची मदत वितरीत केली. जिल्ह्यात २००१ पासून आतापर्यंत १११० इतक्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ११ कोटी १० लाख रुपयाची आर्थिक मदत दिली आहे. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर कुटुंबाला सावरण्यास या मदतीने मोलाचा हातभार लावला आहे. (प्रतिनिधी)
११९ शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात
By admin | Updated: December 6, 2014 02:03 IST