तीन महिला उमेदवारांची माघार : युती दुभंगली, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कुणाला ? यवतमाळ : खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या यवतमाळ नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी आता दहा उमेदवार रिंगणात राहिले आहे. १३ पैकी तीन उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवडणूक होत असल्याने त्याला ‘मिनी आमदाराचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. यवतमाळ नगरपरिषद अध्यक्षपदासाठी २७ नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी निघाल्याने या इच्छुकांचा हिरमोड झाला. यातील काही जण आता नगरसेवक पदाच्या आखाड्यात उतरले आहे. यवतमाळच्या नगराध्यक्ष पदासाठी १३ महिलांनी नामांकन दाखल केले होते. शुक्रवारी नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर तीन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रचना राजेश पाटील, अस्मिता जयसिंग चव्हाण व जरीना अब्दूल गफ्फार मनीयार यांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नगरपरिषदेत भाजपा-शिवसेनेचे उमेदवार आमने-सामने राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना नेत्यांनी मुंबईत युतीची घोषणा केली. परंतु ही युती स्थानिक नेत्यांना मान्य नसल्याचे दिसते. कारण की यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भाजपा-शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे नेत्यांची युतीची घोषणा केवळ औपचारिकता ठरली आहे. यवतमाळच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांच्या सौभाग्यवती कांचन चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने सर्व परिचित सक्षम उमेदवार सापडला नाही म्हणून की काय विद्यमान नगरसेविकेलाच आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बनविले. विधान परिषदेत भाजपा-सेना युतीमध्ये असताना नगरपरिषदेत मात्र परस्परांविरोधात या पक्षाने उमेदवार उभे केले आहे. भाजपाच्या तुलनेत शिवसेनेचा उमेदवार सर्व परिचित असल्याचे मानले जाते. विधान परिषदेचा आडोसा घेऊन भाजपाने यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाच्या सेना उमेदवारावर ‘विड्रॉल’साठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अखेरपर्यंत भाजपाला यश आले नाही. भाजपाचा दबाव झुगारुन सेनेने आपला उमेदवार कायम ठेवला. त्यामुळे यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती दुभंगल्याचे चित्र आहे.या आहेत दहा महिला उमेदवारयवतमाळच्या नगराध्यक्ष पदासाठी आता दहा महिला उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संध्या दिलीप सव्वालाखे, शिवसेनेच्या कांचन श्रीकांत चौधरी, भाजपाच्या रेखाताई, एमआयएमच्या सुनंदा विश्वास वालदे, बहुजन समाज पार्टीच्या शेख शबाना शेख शकील भाकपच्या मनीषा वसंत तिरणकर, तसेच किरण प्रकाश मेश्राम, वंदना सुधाकर घायवान, ज्योती गौतम खोब्रागडे, शेख शकीला परवीन शेख युसुफ यांचा समावेश आहे.
यवतमाळ नगराध्यक्षासाठी १० उमेदवार
By admin | Updated: November 12, 2016 01:35 IST