कारंजा लाड (जि. वाशिम): जिल्हा परिषदेच्या ३२१७ प्राथमिक शिक्षकांचे गत ३ महिन्यांच्या वेतन अदा करण्याचा प्रश्न अद्यापही कायमच आहे. या संदर्भात अधिकार्यांकडून टोलवाटोलीवची उत्तरे देण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा जीव टांगणील लागला असून, या बाबत लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणार्या करणार्या जिल्हा परिषदेच्या ७८८ शाळांमधील ३२१७ शिक्षकांचे वेतन गत तीन महिन्यांपासून रखडल्यामुळे या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. काही तांत्रिक कारणांमुळे जिल्हय़ातील सर्व जि.प. शाळांमधील शिक्षकांचे वेतन थकल्याचे संबंधित वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले होते, तर गत ३ महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्यामुळे शिक्षकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत असतानाही लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी या समस्येकडे गांभिर्याने घेत नसल्यामुळे शिक्षक संघटनांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान वाशिम जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) अंबादास पेंदोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हय़ातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याचे सांगीतले. तसेच एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या वेतनाची बिलेही वित्त विभागाकडे सादर करण्यात आली असून, या दोन महिन्यांचे वेतनही त्यांना लवकरच मिळेल, असे ते म्हणाले.
जि.प. शिक्षकांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न कायमच
By admin | Updated: June 6, 2015 01:04 IST