लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : भगवान महावीर स्वामी यांनी म्हटले आहे की, माणूस हा जन्माने नव्हे; तर कर्माने मोठा असतो. म्हणून कर्म चांगले ठेवा, असे प्रतिपादन प.पु. मुनिश्री विशेष सागर महाराज यांनी रिसोड येथील धर्मप्रभावक उपनयन संस्कार कार्यक्रमादरम्यान केले.उपनयन संस्कार कार्यक्रमादरम्यान रिसोड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.स्थानिक जैन मंदिरापासून ते शिवाजी चौक, सिव्हिल लाईन मार्गे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शोभायात्रा आल्यानंतर मान्यवरांनी स्वागत केले. दरम्यान शोभायात्रेच्या मार्गावर अनेकांनी रांगाळी काढुन शोभायात्रेचे स्वागत केले. शिवाजी विद्यालय येथे ध्वजारोहन करण्यात आले. संस्कार विधीचा शुभारंभ पवनकुमार शास्त्री मुनिरा यांच्या मंगलास्टकाने झाला. यावेळी विविध ठिकाणांवरून आलेल्या मान्यवरांनी मुनिश्री यांना श्रीफळ देवुन सत्कार केला. यावेळी २०० युवक, युवतींनी जैन उपनयन संस्कार केले. पुढे बोलताना मुनिश्री विशेष सागर महाराज म्हणाले की, प्रत्येकाने धर्माचे आचरण तंतोतंत केले पाहिजे. माणूस हा कर्माने मोठा ठरत असल्याने कर्मावर भर दिला पाहिजे. व्यापक समाजहित जोपासले पाहिजे, असे सांगितले. यावेळी राजु रोकडे (खामगाव) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सकल जैन समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माणुस जन्माने नव्हे; तर कर्माने मोठा असतो - मुनिश्री विशेष सागर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:02 IST