मालेगाव : शहरातील जिल्हा परिषद शाळे मागे प्रभाग क्रमांक सातमध्ये असलेल्या जैन धर्मशाळेच्या इमारत परिसरात उर्वरीत कामे सुरू झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने २८ सप्टेंबरला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.चार वषार्पूर्वी पर्यटन विकास अंतर्गत जैन धर्मशाळेसाठी ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या मालकीच्या जागेत या इमारतीचे काम सुरू झाले होते. या धर्म शाळेसाठी तत्कालीन मंत्र्यांनी एक कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली होती, असे वृषभनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र देशभूषण टिकाईत यांनी सांगितले. अंतिम टप्प्यातील कामे ही निधीअभावी रखडली. संरक्षण भिंत नाही, चिखलमय रस्ता आहे, घाणीचे साम्राज्य पसरले यासह अन्य समस्यांच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने २८ सप्टेंबरच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने उर्वरीत कामे करण्याला सुरूवात केली. यामुळे समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान या धर्मशाळेचे रखडलेले काम त्वरित पूर्णत्वास नेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी आशिष डहाळे यांच्यासह समाज बांधवांमधून होत आहे.
मालेगाव येथील जैन धर्मशाळेचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:19 IST